देश-विदेश
ठाणे, उरण, तारापूरसह १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल
ठाणे, उरण, तारापूरसह १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल
फोटो: ठाणे वैभव
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती अधिक गंभीर बनली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, उद्या बुधवारी एकाचवेळी या मॉकड्रिल्स पार पडणार आहेत.
देशातील 259 शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सर्तकतेचा बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
पहिल्या गटात अति संवेदनशील ठिकाणांचा समावेश असून, यामध्ये मुंबई, उरण व तारापूर या तीन ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे. तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे.
या ठिकाणी बुधवारी 7 मे रोजी मॉकड्रिल घेण्यात येणार असून, नागरी संरक्षण यंत्रणांना त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आज कल्याणमध्ये सायरन वाजणार
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे 7 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांनी केले आहे.
या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक विजय जाधव व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600