जिल्हा
मालमत्ता थकबाकीदारांसमोर मनपाने वाजवले ढोल
सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील आठ युनीट सील
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता थकबाकीदारांना वारंवार आवाहन तसेच अभय योजना सुरू करून देखील काही मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अशा बड्या मालमत्ता थकबाकीदारांच्या समोर ढोल वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
या मोहिमेची सुरुवात सोमवार २० मार्चपासून करण्यात आली आहे. महापालिकेने सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधून २०-२१ कोटींची थकबाकी असून १५ जणांवर कारवाई करण्याचे नियोजन होते. परंतु त्यापैकी काहींनी ५० लाखांची रक्कम दिल्याने त्यांच्यावर तूर्तास कारवाई केली नाही. परंतु सहा कोटी ६६ लाखांची थकबाकी असलेल्या आठ जणांवर कारवाई करून युनिट सील करण्यात आले आहेत.
नवी मुंबई महानगर पालिकेत मालमत्ताकर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मात्र नवी मुंबई शहरात आजही मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे.
करोना काळात ही थकबाकी अधिक झाली होती. त्यामुळे करोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ता कर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करण्यात आली होती. मात्र अभय योजना लागू करून देखील काही थकबाकीदारांनी कर भरण्यास पाठ फिरवली आहे. त्यामुळे अशा मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्यांकडे पालिकेने कर वसुलीसाठी लक्ष केंद्रित केले, त्यांना नोटिस बजावल्या आहेत. मात्र नोटिस बजावून देखील कर भरण्यास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. थकबाकीदारांसमोर ढोल वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600