जिल्हा
सराफाच्या घरात चोरी करणारे मायलेक दिव्यातून जेरबंद
दहा गुन्हे उघडकीस, ११ लाखांचा ऐवज हस्तगत
ठाणे: लहान मुलाच्या मदतीने शहरातील बंद घरे फोडून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या सराईत मायलेकास नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून १० गुन्ह्यांत चोरलेला ११ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
गणेश गुप्ता उर्फ गणेश आव्हाड (२०) आणि पूजा गुप्ता उर्फ पूजा आव्हाड (४५) अशी आरोपी मायलेकांची नावे आहेत. ते दिवा येथील डंपींग ग्राउंड परिसरात राहतात. गणेश आणि त्याची आई पूजा हे दोघे मिळून ठाणे शहरात संगनमताने घरफोड्या करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
ठाणे शहरात नौपाडा भागात राहणारे अतुल मराठे यांच्या घरात १३ जुलै रोजी घरफोडी झाली. या घटनेची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील तसेच शहरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात. एक महिला आणि तिच्यासोबत दोन लहान मुले दिसून येत होती. त्यातील एका लहान मुलीच्या पाठीवरील बॅगमध्ये घरफोडीकरीता लागणारे सामान काढताना दिसून आले.
आरोपी महिला ही सराईत गुन्हेगार असल्याचे निषन्न झाले. आरोपीकडून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदीची भांडी आणि दागिने, ४० हजार रुपये रोख तसेच घरफोडीची हत्यारे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
घटनास्थळाजवळील सीसीटिव्ही पोलिसांनी तपासले असता, घरफोडी केल्यानंतर महिला ही पोलीसांना गुंगारा देण्यासाठी घटनास्थळावरील प्रत्येक रस्ता हा ३००-४०० मीटर पुढे जाऊन तिथे १५-२० मिनिटे थांबुन पुन्हा रस्ता बदलत असल्याचे दिसले. या महिलेसोबत असलेल्या साथीदारांचा चेहरा एका सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट दिसून आला. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा फोटो काढला. या फोटोंच्या आधारे ठाणे शहरातील सिध्देश्वर तलाव, खोपट, तलावपाळी, चंदनवाडी ठाणे रेल्वे स्थानक परिसर तसेच वागळे इस्टेट, वर्तकनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा पोलीस ठाण्याचे हद्दीत तपास केला. त्याचबरोबर काही तांत्रिक तपासावरून आणि गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार घरफोडी करणारे आरोपी दिवा डंपीग ग्राउंडमध्ये दाट लोकवस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस त्याठिकाणी गेले असता, आरोपी गणेश याने पोलिसांना पाहून तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन घरफोडीच्या हत्यारासह गणेशला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये आरोपीने त्याची आई पूजा आव्हाड हिच्यासोबत मिळून ठाणे शहर परिसरात अनेक घरफोड्या आणि चोऱ्या केल्याचे कबूल केले. आरोपी हा त्यास मिळालेल्या घरफोडीतील मोठ्या प्रमाणात सोने व चांदी दागीने आणि शिक्के हे मुंबई व ठाणे परिसरातील सराफास विकून मिळालेले पैसे घेऊन परजिल्ह्यात पसार होण्याचा त्याचा मनसुबा होता, असे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600