महाराष्ट्र
महायुतीकडून नरेश म्हस्के; आज ठाण्यातून अर्ज भरणार
शिवसेना विरुद्ध शिवसेना होणार लढत
ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे लोकसभा मतदार संघासाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आपल्या पदरात पडून घेतले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून प्रवक्ते नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून ठाणे लोकसभा कोणाकडे जाणार यावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर ही जागा आपल्याकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मंगळवारी भाजपच्या वतीने नामनिर्देशन अर्ज खरेदी केल्यामुळे ठाणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत उत्कंठा वाढली होती. तर बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चारही इच्छुक उमेदवारांना आपल्या ठाण्याच्या निवासस्थानी बोलावून एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत अखेर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर बुधवारी म्हस्के यांचे नाव अखेर मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले.
नरेश म्हस्के हे दोनवेळा स्विकृत सदस्य म्हणून ठाणे पालिकेत दाखल झाले. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना मिळाले. परंतु 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि सर्व राजकीय पक्षांसोबत असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळेच अखेर पक्षाला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली आणि भाजपाला दिलेला शब्द मोडत त्यांना स्थायी समितीचे सभापतीपदही बहाल करावे लागले होते. त्यानंतर आता 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेते पदही त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी महापौर पदाची धुराही सांभाळली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासु समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या शिवसेनेचे प्रवक्ते पद असून त्यांचे संबंध भाजपच्या नेत्यांशीही चांगले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देणाऱ्या म्हस्के यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी पार पाडताना म्हस्के यांनी शिंदे गटाची भूमिका जोरदारपणे मांडत विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले. यासोबतच त्यांच्यावर ठाणे-कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्व्यकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभेची मला दिलेली जबाबदारी म्हणजे एका सर्वसामान्य शिवसैनिकाचा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या साथीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवू, असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600