जिल्हा
तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेनंतरच बदलापुरकरांना नवी लोकल
खासदारांच्या अतिरिक्त लोकलच्या मागणीवर रेल्वेचा खुलासा
बदलापूर : कल्याण रेल्वे स्थानकात यार्ड रिमॉडेलिंग तसेच तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. ही कामे झाल्यानंतरच नव्या लोकल चालवता येतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बदलापूरकर रेल्वे प्रवाशांना सकाळच्या सत्रात नव्या लोकलसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
बदलापूर रेल्वे मार्गावर अतिरिक्त लोकल वाढवाव्यात अशी मागणी स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना रेल्वे प्रशासनाने सध्या अतिरिक्त लोकलगाड्या चालवणे शक्य नसल्याचा खुलासा केला आहे.
बदलापूर हे झपाट्याने नागरिकरण होत असलेले शहर आहे. दररोज येथे नवी कुटुंब येथे स्थलांतरीत होत असतात. त्यामुळे पर्यायाने रेल्वे प्रवासी संख्या वाढते. नोकरदार वर्गाची संख्याही अधिक असल्याने सकाळच्या वेळी हजारो प्रवासी मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. परिणामी सकाळच्या सत्रात धावणाऱ्या लोकल गर्दीने भरून धावतात. गर्दीमुळे प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेकदा अपघाताची भीती असते. त्यामुळे सकाळच्या म्हणजे गर्दीच्या सत्रात लोकल गाड्यांची संख्या वाढवावी, अशी अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी आहे. हीच मागणी स्थानिक खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनीही रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीच्या पत्रावर रेल्वेच्या अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी पत्राद्वारे खुलासा केला आहे.
पत्रामध्ये उत्तर देताना रेल्वेच्या वतीने नव्या अतिरिक्त लोकल सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी ६ ते १० वाजेदरम्यान बदलापूर रेल्वे स्थानकातून १६ लोकल मुंबईच्या दिशेने धावतात. त्यातील काही लोकल कर्जत, खोपोली या स्थानकातून सोडल्या जातात. तर अन्य लोकल बदलापूर स्थानकातून सोडल्या जातात. दिवसभरात कल्याण ते कर्जत या दरम्यान २४२ लोकलगाड्या चालवल्या जातात अशीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या मार्गाची १०० टक्के क्षमता पूर्ण झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. परिणामी बदलापूर ते मुंबई दरम्यान कोणतीही नवी लोकल रेल्वे सुरू करता येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना नव्या लोकलसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने पहाटे ३ वाजून ३ मिनिटांनी पहिली लोकल धावते. तसेच सकाळी ११ वाजेपर्यंत २५ लोकल मुंबईच्या दिशेने धावतात. यात सकाळी ६ ते १० दरम्यान १६ लोकल धावत असल्याचे रेल्वे प्रशासन सांगते. मात्र या गर्दीच्या काळात काही लोकलमधील अंतर हे ३० मिनिटांपर्यंतचे आहे. सकाळी ६.२२ च्या लोकलनंतर थेट ६.४६ ची मुंबई लोकल आहे. ७.१४ च्या लोकलनंतर थेट ७.३३ ची लोकल आहे. तर ८.५९ नंतर थेट ९.२९ ची मुंबई लोकल आहे. तसेच ९.३८ नंतर थेट १०.१८ मिनिटांची लोकल आहे. त्यामुळे या काळात स्थानकात प्रवाशांना खोळंबून राहावे लागते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600