जिल्हा
ना शौचालय, ना आरोग्य केंद्र; ढोकाळीत सुविधांची वानवा
* निधी असूनही प्रभाग समिती सुस्त
* आ. संजय केळकर यांची कारवाईची मागणी
ठाणे: ढोकाळी गावातील दीड हजार लोकवस्तीसाठी असलेले एक शौचालय धोकादायक अवस्थेत असून दुसरे वापरायोग्य नाही. शौचालयासाठी निधी असताना प्रभाग समितीचे अधिकारी झोपा काढत असल्याबाबत आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.
नालेसफाई आणि रस्ते कामांची पाहणी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी सर्व प्रभागांतील सुविधा कामांची पाहणी सुरू केली आहे. स्थानिक रहिवाशांच्या विनंतीनंतर त्यांनी आज ढोकाळी गावात भाजपा पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला त्यांना आढळून आला. येथे असलेले एक शौचालय धोकादायक असल्याने ते बंद करण्यात आले आहे. दुसरे शौचालय दयनीय अवस्थेत असून वापरायोग्य नसल्याचे दिसून आले. दरवाजे, कडी-कोयंडे, भांडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने रहिवाशांची विशेषतः महिलांची कुचंबणा होत असते. यावेळी रहिवाशांनी प्रशासनाबाबतच्या संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर आमदार केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना फोन करून या बाबतची माहिती दिली. यावर आयुक्तांनी धोकादायक शौचालय पाडून नवीन शौचालय आणि अन्य शौचालयाची दुरुस्ती ४८ तासात सुरू करण्याचे आश्वासन श्री.केळकर यांना दिले.
शौचालयासाठी निधी उपलब्ध असताना प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव का केला नाही, अपघाताची वाट पहात होते का असे प्रश्न उपस्थित करत या सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली.
ढोकाळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असून पाण्याच्या टाकीचीही दुरवस्था झाली आहे. या वास्तूंसह अन्य सुविधांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी श्री.केळकर यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी ॲड. हेमंत म्हात्रे, दत्ता घाडगे, मत्स्यगंधा पवार तन्मय भोईर, सचिन शिनगारे, रवी रेड्डी, जितू मढवी, प्रल्हाद पाटील, वामन पाटील, विजय पाटील, भालचंद्र म्हात्रे, विलास चौधरी, उमेश साळसकर, विजय वड आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600