जिल्हा
१ जुलै पासून दिव्यातीलअधिकृत शाळा बेमुदत बंद राहणार
ठाणे: दिव्यातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्याने दिव्यातील अधिकृत शाळा १ जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा इंडिपेन्डन्ट स्कुल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द केली जाते. या शाळांमध्ये पाल्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. महापालिका हद्दीत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकडा अधिकचा असलेला दिसून आला आहे. सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे याचाच फायदा घेत झोपडपट्टी भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत आहे. दिव्यात आजच्या घडीला ८१ शाळा या बेकायदा असल्याचा दावा या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
अनधिकृत शाळांच्या संदर्भात ४० ते ४५ वेळा तक्रारी करण्यात येऊनही
पालिकेच्या शिक्षण विभागाला याचे गांभीर्यच नसल्याने शिक्षण विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई या शाळांवर झालेली नाही. यापूर्वी काही शाळांवर कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र पुन्हा या शाळा सुरु झाल्या असून ही संख्या कमी होण्याऐवजी आता वाढली असून ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच या बेकायदा शाळांना अभय मिळत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यातील अधिकृत शाळा १ जुलै पासून बेमुदत बंद राहणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600