जिल्हा
धोकादायक इमारतींबाबत अनुचित घटना घडल्यास अधिकारी जबाबदार
आयुक्त ढोले यांचा अधिकाऱ्यांना इशारा
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीस उपायुक्त मारुती गायकवाड, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग समिती सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. महापालिका मुख्यालयातील बैठकीत शहरातील धोकादायक इमारतीबाबत चर्चा करून धोकादायक इमारतीवर पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त ढोले यांनी दिल्या आहेत. शहरातील सर्व धोकादायक इमारतींना तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत. तसेच जिथे शक्य असेल त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिकेच्या फंडातून करण्याच्या सूचना दिल्या. स्ट्रक्चरल ऑडीट अहवालानुसार धोकादायक असलेल्या बांधकामांवर न्यायालयाचे आदेश तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर कामात कुचराई अथवा हलगर्जीपणाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही तसेच धोकादायक इमारतीवर कारवाई न झाल्याने काही अनुचित घटना घडून जीवित आणि वित्तहानी झाल्यास त्याकरीता सबंधित अधिकाऱ्यास जबाबदार ठरवले जाणार असल्याची सक्त ताकीद आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600