महाराष्ट्र
एक मिनिट कल्याण-डोंबिवलीसाठी एक मिनिट स्वच्छतेसाठी
* ठाणेवैभव, कडोंमपा आणि ऋतू ग्रुपचा संयुक्त उपक्रम
* शहर स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या विविध घटकांचा कडोंमपातर्फे सन्मान
कल्याण: 'ठाणेवैभव'ची संकल्पना असलेला 'एक मिनिट स्वच्छतेसाठी' हा अनोखा उपक्रम ठाण्यात यशस्वी झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने देखील या उपक्रमाचा स्वीकार केला आहे. 'ठाणेवैभव', कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ऋतू ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचे उद्घाटन महापालिकेच्या विशेष कार्यक्रमात करण्यात आले.
एक मिनिट स्वच्छतेसाठी, एक मिनिट ठाण्यासाठी या उपक्रमाला ठाणे शहरात उदंड प्रतिसाद मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या उपक्रमाची दखल घेतली आहे. 'ठाणेवैभव'च्या या उपक्रमाचा स्वीकार कल्याण डोंबिवली महापालिकेने केला असून शहरात शाळा, विविध आस्थापना आदी ठिकाणी हा उपक्रम राबवून स्वच्छतेचे आवाहन करण्यात येणार आहे. शहरासाठी, शहरातील स्वच्छतेसाठी एक मिनिट देण्याची प्रतिज्ञा नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 'ठाणेवैभव', कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ऋतू ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
स्वच्छता ही सेवा हे अभियान कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात राबवण्यात आले. शहरातील नागरिकांचा स्वच्छतेतील सहभाग वाढावा याकरिता महापालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमातील योगदानाबाबत विविध घटकांचा महापालिकेतर्फे सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात या उपक्रमाची ध्वनी-चित्रफीत दाखवून आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते 'ठाणेवैभव'चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आणि ऋतू ग्रुपच्या संचालिका संगिता पटेल यांचाही सत्कार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत उपस्थितांनी एक मिनिट स्वच्छतेसाठी आणि एक मिनिट कल्याण-डोंबिवलीसाठी देण्याची शपथ घेतली.
शहरातील नागरिकांचा स्वच्छतेतील सहभाग वाढावा याकरिता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत जी+७ ते जी+१६ आणि जी+१७ या गटात सहभाग नोंदवलेल्या सोसायट्यांमधून निकषानुसार स्वच्छ सोसायट्यांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
महापालिका परिसरातील स्वच्छ आणि पर्यावरणपुरक शासकीय कार्यालये या स्पर्धेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालय आणि प्रभागक्षेत्र कार्यालये तसेच स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता अधिकारी, मुकादम, सफाई कामगार यांना देखील त्यांनी बजावलेल्या स्वच्छतेविषयक उत्कृष्ट कामगिरीबाबत स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महापालिकेस वेगवेगळ्या उपक्रमांसाठी तत्परतेने सहाय्य करणाऱ्या पर्यावरण दक्षता मंडळ, सोलॅस इंडिया, ऊर्जा फाऊंडेशन या संस्थांचा तसेच विविध महाविद्यालये व शाळांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त अतुल पाटील, अवधुत तावडे, संजय जाधव, सहायक आयुक्त प्रिती गाडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. महापालिका परिक्षेत्रातील अनेक नागरिकांनी, विविध सामाजिक संस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600