जिल्हा
आज पांडुरंग बरोरा भाजपात प्रवेश करणार
आज पांडुरंग बरोरा भाजपात प्रवेश करणार
फोटो: ठाणे वैभव
किन्हवली : शहापूर तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग बरोरा हे भाजपात जाणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्यांची भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली असून उद्या मंगळवार १५ एप्रिल रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे.
दरम्यान त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून कोण कोण पदाधिकारी जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांचे वडील महादू बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. राष्ट्रवादीमधून पांडुरंग बरोरा हे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले होते. पुढे ते याच पक्षातून आमदार झाले होते. आमदार असतानाच त्यांनी अचानक राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होता. मात्र सेनेत त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. शिवसेना फुटीनंतर ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. पुढे शिंदे गटातून त्यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. २०२४च्या निवडणुकीत ते थोड्या मताने पराभूत झाले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मात्र ते शहापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात शांत होते. ते भाजपात जाणार याबाबत सर्वत्र चर्चा होती. अखेर त्यांचा प्रवेशाचा दिवस निश्चित झाला असून ते मंगळवारी १५ एप्रिल रोजी मुंबई येथे प्रवेश करणार आहेत.
दरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक अनेकदा प्रवेश करतात. मात्र यावेळेस भाजपमध्ये त्यांच्यासमवेत कोण कोण प्रवेश करणार याची उत्सुकता सर्वांना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक समर्थक हे प्रवेश करणार नसल्याचे बोलले जाते. दरम्यान पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडणार असल्याने आगामी काळात शहापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडझड होणार असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600