जिल्हा
संस्थाने विलिनीकरणात पटेलांची नीती स्वा. सावरकर यांच्या आग्रहाप्रमाणेच
संस्थाने विलिनीकरणात पटेलांची नीती स्वा. सावरकर यांच्या आग्रहाप्रमाणेच
फोटो: ठाणे वैभव
सावरकरवादी विचारवंत अक्षय जोग यांचा दावा
ठाणे: संस्थान विलिनीकरण ही भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी आणि कणखर धोरण होते, ज्याद्वारे त्यांनी अनेक संस्थानांना विलीन करून अखंड भारताची निर्मिती केली; मात्र, पटेल हे गांधीवादी असले तरी, संस्थानांचे विलिनीकरण करताना त्यांनी जी निती वापरली ती निती स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्यभर ज्याच्यासाठी आग्रही होते, तशीच होती, असा दावा सावरकरवादी विचारवंत अक्षय जोग यांनी केला आहे.
ठाण्यात सुरू असलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ते बोलत होते. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या पटांगणात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेली ४० वी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेत "पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल" हे पाचवे पुष्प सावरकरवादी विचारवंत अक्षय जोग यांनी गुंफले. याप्रसंगी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक, सुहास जावडेकर आदी उपस्थित होते. तर निवेदन व्याख्यानमालेचे संस्थापक सदस्य विजय जोशी यांनी केले.
अक्षय जोग यांनी अनेक संदर्भ पत्रके समोर ठेऊनच वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडला. ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी जन्मलेले वल्लभभाई पटेल भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले. मुत्सद्देगिरी व प्रसंगी सैन्यबळ वापरून सरदार पटेलांनी संस्थाने भारतात विलीन केली. भारतात ५६५ संस्थाने होती. यातील काही संस्थाने खुपच छोटी होती. त्यांना शेजारच्या राज्यात विलीन होण्यास सांगण्यात आले होते. यातीलच मुंबई संस्थान संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाले. विलीनीकरणाच्या कामात नेहरू यांच्यासोबत गव्हर्नर व्हॉईसरॉय माऊंट बॅटन हेही होते. त्यांच्या सहकार्यामुळेच पटेलांना विलिनीकरण करता आले. मात्र, पटेल गांधीवादी असले तरी संस्थानांचे विलिनीकरण करताना जी नीती वापरली होती, ती स्वा. सावरकर यांनी ज्याचा आग्रह धरला तीच नीती होती, असा दावा जोग यांनी केला. पाश्चात्य लेखकांच्या हवाल्याने गांधी, नेहरू आणि पटेल यांच्यातील संबंधाविषयी भाष्य करताना त्यांनी पटेल हे नंतर नंतर काहीसे हिंदुत्वाकडे झुकत चालले होते, असे सांगितले. कारण संविधान निर्मितीच्या चर्चेत स्वतंत्र भारतात मुसलमानांसाठी राखीव राजकिय जागा ठेवाव्यात असा मतप्रवाह आला असता त्यावर पटेल यांनी, परखडपणे ज्यांना पाकिस्तानविषयी प्रेम आहे, त्यांनी खुशाल जावे. इथे विघ्नसंतोषीपणा करू नका, असे सुनावल्याचे जोग यांनी संदर्भ देत स्पष्ट केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600