जिल्हा
भिवंडीतील ३२ थकबाकीदारांच्या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात
महापालिकेचा थकबाकीदारांना दणका
ठाणे : भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास वारंवार मुदत देऊनही असमर्थता दाखविणाऱ्या ४५ थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतरही थकबाकीदार मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यातील ३२ मालमत्ता प्रशासनाने नाममात्र दराने ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व अनिवासी मालमत्ता आहेत.
थकबाकी असलेल्या ५८५ थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. या कारवाईच्या निमित्ताने पालिका प्रशासनाने थकबाकीदारांना दणका दिल्याचे बोलले जात आहे.
भिवंडी महापालिकेने मालमत्ता करासह इतर करांच्या वसुलीवर गेल्या दोन वर्षांपासून भर दिला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु या आवाहनाकडे काही मालमत्ताधारक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. कर भरण्यास असमर्थता दाखविणाऱ्या अशा थकबाकीदारांविरोधात पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत ४५ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांधारकांना थकीत करापोटी मागणी बिल, मागणी नोटीस, जप्तीचे अधिपत्र बजावूनही त्यांनी थकीत कराच्या रक्कमेचा भरणा पालिकेकडे केलेला नाही. त्यामुळे ४५ पैकी ३२ मालमत्तांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु लिलाव प्रक्रीयेस प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने या ३२ मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेतल्या आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600