जिल्हा
प्रकल्पांचे झाले ओझे; ठामपा काढणार कर्जरोखे
प्रकल्पांचे झाले ओझे; ठामपा काढणार कर्जरोखे
फोटो: ठाणे वैभव
* ४०० कोटींचे म्युनिसिपल आणि ग्रीन बॉण्ड
* मंजुरीसाठी प्रस्ताव महासभेत
ठाणे : ठाणे महापालिकेकडून शहरात अनेक मोठे महत्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात असून त्याचे आर्थिक ओझे सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी प्रशासनाने २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉण्ड आणि २०० कोटी रुपयांचे ग्रीन बॉण्ड, असे एकूण ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचे ठरवले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.
महापालिकेने यापूर्वी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी २०२४-२५ मध्ये ११५ कोटी रुपये आणि २०२५-२६ मध्ये ९८.६८ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले आहे. त्यानंतर सादर झालेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात क्लस्टर पुनर्विकास, अमृत २.०, एसटीपी आणि अन्य प्रकल्पांसाठी आवश्यक निधीपैकी ५० टक्के म्हणजे सुमारे २७७ कोटी रुपये कर्ज आणि बॉण्डमधून उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याचवेळी आणखी बिनव्याजी कर्ज मिळविण्याचे नियोजन असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले होते.
आता महासभेपुढे आलेल्या प्रस्तावात मात्र ४०० कोटी रुपयांचे बॉण्ड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉण्ड पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तर २०० कोटी रुपयांचे ग्रीन बॉण्ड पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहेत. या निधीतून ई-मोबिलिटी आणि स्मार्ट मोबिलिटी, क्लस्टर पुनर्विकास, मलनिस्सारण व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), घनकचरा व्यवस्थापन, हरित क्षेत्र विकास, हवामान बदलाशी संबंधित प्रकल्प तसेच अन्य पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. विशेष म्हणजे, आशियातील सर्वात मोठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठीही या निधीचा आधार घेतला जाणार आहे.
प्रस्तावानुसार बॉण्डचा कालावधी सात ते २० वर्षे राहणार आहे. व्याजदर बाजारस्थितीनुसार ७.५ ते ८.५ टक्क्यांदरम्यान असण्याची शक्यता आहे. सेबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रक्रिया आणि स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बॉण्ड इश्यू समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव असून, संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे १.५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प 6200 कोटींच्या पुढे असून दायित्व अडीच हजार कोटींच्या घरात आहे. विविध करांच्या मार्फत ठाणे महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600