जिल्हा
'त्या' सहा जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या
'त्या' सहा जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या
फोटो: ठाणे वैभव
दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी
ठाणे : सकाळी गर्दीच्या वेळेस डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या सहा जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा, या मागणीसाठी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांची भेट घेतली.
दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढण्याची सरासरी लक्षात घेतली तर यामध्ये दिवा स्थानकाचा पहिला क्रमांक लागतो. सकाळी गर्दीच्या वेळेत दिवा स्थानकात जलद लोकल थांबत असल्या तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस ज्या काही जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा दिला आहे, त्यापैकी बऱ्याचशा लोकल अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, कर्जत, कसारा, खोपोली, अंबरनाथ, टिटवाळा या स्थानकातून सुटतात. परिणामी, त्या सर्वच लोकल प्रवाशांनी गच्च भरून येतात. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांना लोकलमध्ये चढता सुध्दा येत नाही.
सकाळी गर्दीच्या वेळेस डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून सुटणारी सकाळी ६:१४ची डोंबिवली-सीएसएमटी, सकाळी ६.३२ची कल्याण-सीएसएमटी, सकाळी ७.१८ची कल्याण-सीएसएमटी, सकाळी ८.३३ची कल्याण-सीएसएमटी, सकाळी ९:४७ची कल्याण-सीएसएमटी आणि सकाळी १०.०२ची कल्याण-सीएसएमटी या जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी ॲड. आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
दिवा रेल्वे स्थानकात १५ डब्यांच्या लोकल उभ्या राहतील इतकी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही मागणी केलेल्या जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देणे सहज शक्य असल्याचे मत भगत यांनी व्यक्त केले. दिवेकर रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय व गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मागणी तत्काळ पूर्ण करावी, अशी विनंती दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने नगरसेवक भगत यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600