जिल्हा

तातडीने घरगुती गॅसजोडणी द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा

तातडीने घरगुती गॅसजोडणी द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा
तातडीने घरगुती गॅसजोडणी द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा फोटो: ठाणे वैभव
महानगर गॅस अधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांची तंबी ठाणे: ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या रहिवाशांना तातडीने पाईप लाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी, अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आली, अर्ज दिले. बैठकाही घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागातील नागरिकांना घरगुती गॅसऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती, प्रकाश पायरे आदींनी पुढाकार घेतला. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस लाईनच पोहोचलेली नाही, तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत, काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशा रहिवाशांनी तक्रारी केल्या. या बैठकीत शिवसेनेचे किरण नाकती आणि प्रकाश पायरे यांनी अनेक सोसायटी संदर्भात समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या. महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही. म्हणूनच या कंपनीने जबाबदारीने काम करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही सरकारी मान्यतेने सेवा देत आहात, पण नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली. महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तत्काळ गॅस जोडणी पूर्ण करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विलास जोशी, भास्कर पाटील, प्रीतम रजपूत, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600