जिल्हा
एसी लोकलवर चढलेल्या मनोरुग्णाला विजेचा धक्का
एसी लोकलवर चढलेल्या मनोरुग्णाला विजेचा धक्का
फोटो: ठाणे वैभव
पोलिसांनी वाचवले प्राण
ठाणे : दिवा रेल्वे स्टेशन येथे एसी लोकलच्या छतावर चढलेल्या एका मनोरुग्णाला वीजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना उघडकीस आली. आज सकाळ साडे दहा वाजता ऐन गर्दीच्या ही घटना घडली. या घटनेमुळे तब्बल २४ मिनिटे लोकल सेवा खोळंबली होती.
ओव्हर हेड वायरच्या विजेचा जोरदार धक्का बसल्याने हा मनोरुग्ण होरपळला आहे. याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी धाव घेत तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि त्या मनोरुग्णाचे प्राण वाचले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणला जाणारी एसी लोकल आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकात पोहचली. दिवा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर रेल्वेच्या छतावरून जोरजोरात शॉर्टसर्किट झाल्याचा आवाज येऊ लागला. दरम्यान प्रसंगावधान राखत मोटरमनने गाडी थांबवली असता एक माथेफिरू एसी लोकलच्या छतावर बसल्याचे आढळून आले. हा तरुण होरपळला होता. त्याच्या अंगावरचे कपडेही जळाले होते. याबाबत माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी शरद आलिमकर, देवेश पाटील, प्रदीप मोरे, सफाई कामगार मुकादम, हमाल बिरबल, रेल्वे लोहमार्ग पोलिस नंदकिशोर राऊत, प्रदीप पवार यांनी तातडीने धाव घेत त्या तरुणाला खाली उतरवले. दरम्यान या घटनेमुळे रेल्वे सेवा कोलमडल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
वीजेच्या धक्काने होरपळल्याने तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सायन रुग्णालय येथे पाठवले असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600