महाराष्ट्र
नवी मुंबईतील खदान तलाव बनत आहेत मृत्यूचे सापळे
तरुणाच्या मृत्यूचे कारण एक आठवड्यानंतर समोर
नवी मुंबई: नवी मुंबई शहराच्या पूर्वेला असलेल्या डोंगराळ भागात दगड खाणीमुळे डबके तयार झाले आहेत. पावसाळ्यात या डबक्यात तरुण मुले पोहण्यासाठी जातात, मात्र पाण्याचा अंदाज येत नसल्याने दरवर्षी या डबक्यात तरुणांचा बुडून मृत्यू होत आहे. यंदा देखील तुर्भे परिसरात ९ जून रोजी एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूचे कारण एक आठवड्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
नवी मुंबईतील पूर्व दिशेला दगडखाणी क्वाऱ्या चालत असत. १९९७ ला पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेना-भाजप सरकारने येथील दगडखाणी क्वाऱ्या कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. या दगडखाणी बंद केल्यानंतर येथील खाणीत पावसाळ्यात पाणी भरू लागले. पावसाळ्यात नवी मुंबईतील पर्यटन स्थळांवर बंदी असते. त्यामुळे तरुण मुले अशा निर्जन तलावात पोहण्यासाठी जातात. मात्र पाण्याचा अंदाज येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू होत आहे. ९ जून रोजी देखील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या स्टोन क्वारीच्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. थट्टा मस्करी करताना एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला आणि त्यामुळे बुडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना त्याच्या मित्रांनी लपवून ठेवली होती. मात्र तुर्भे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तांत्रिक तपास करून या मृत्यूचा छडा एक आठवड्यानंतर लावला.
या प्रकरणी चारही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केला. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधार गृहात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600