जिल्हा
रिव्हर्स लेनमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा गायब
रिव्हर्स लेनमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा गायब
फोटो: ठाणे वैभव
ठाणे वाहतूक पोलिसांचा स्मार्ट निर्णयामुळे ठाणेकरांना दिलासा
ठाणे: पूर्व द्रुतगती मार्गावरील पुलाच्या कामामुळे मुंबईकडे जाणारा चार पदरी रस्ता दोन पदरी झाल्याने मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली होती. सकाळच्या गर्दीच्या वेळेत ठाणेकरांना रोजच्या प्रवासात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी तत्परता, नियोजन आणि धाडसी निर्णयक्षमतेच्या बळावर ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणली आहे.
वाहतूक शाखेने परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून सकाळी ७ ते ९ या अत्यंत गर्दीच्या वेळेत ‘रिव्हर्स लेन’ सुरू करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एक लेन तात्पुरती बंद करून ती ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. या अभिनव उपाययोजनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत.
पूर्वी घोडबंदर, कल्याण तसेच शहरातील विविध भागांतून येणारी वाहने द्रुतगती मार्गावर अडकून पडत होती. अनेकांना कामावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत होता. मात्र वाहतूक पोलिसांच्या अचूक नियोजनामुळे आता वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
या प्रयोगाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर उभे राहून वाहने नियंत्रित करणे, नागरिकांना योग्य दिशादर्शन करणे, अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे. ही सर्व जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.
सकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा ताण लक्षात घेऊन रिव्हर्स लेनचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना कमीत कमी अडथळा येईल आणि वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आमचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून नियोजन राबवत आहेत. परिस्थितीनुसार पुढेही आवश्यक ते बदल करण्यात येतील, अशी माहिती पंकज शिरसाठ यांनी दिली.
उन्हातान्हात उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रयोग यशस्वी ठरत आहे. वाहतूक पोलिसांच्या या सकारात्मक आणि लोकाभिमुख उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. पूर्वी सकाळच्या वेळेत कारने मुंबईला जाताना खूप कंटाळा यायचा, मात्र आता पटकन जाता येत आहे. पोलिस प्रशासनाने समस्येवर तत्काळ उपाय शोधत कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केल्याचे मत ठाण्यातील वाहनचालक विवेक सबनीस यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600