जिल्हा

ठाण्यात पावसाचा हजार मिमीचा टप्पा पार

ठाण्यात पावसाचा हजार मिमीचा टप्पा पार
ठाण्यात पावसाचा हजार मिमीचा टप्पा पार फोटो: ठाणे वैभव

२४ तासांत १८४ मिमी पाऊस, धरणांनाही मोठा दिलासा

बारवी नदीने इशारा पातळी गाठली

ठाणे : ठाण्यात गेल्या २४ तासांत तब्बल १८४.६६ मिमी पावसाची नोंद झाल्याने यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमानाने एक हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, पाणी तुंबणे आणि अन्य घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने ४ आणि ५ जुलै या दोन दिवसात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला होता. ४ जुलै सकाळी ८.३० ते ५ जुलै सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात १८४.६६ मिमी इतका पाऊस पडला. या दरम्यान ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे ९३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शनिवारी २४ तासात २४ झाडे पडली, त्यामध्ये दोन जण जखमी झाले होते. तर २४ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. मुसळधार पावसाने ठाणेकरांचे हाल झाले होते. रविवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ठाण्यात दहा झाडे उन्मळून पडली. दिवा येथे एका इमारतीचा स्लॅप पडला तर श्रीनगर भागातील जलवाहिनी फुटून पाणी तुंबल्याची घटना घडली होती. ठाणे शहरात मागील वर्षी ९८९. ६७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र त्यापेक्षा जास्त पाऊस पडला. रविवारी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत 1015 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. मागील वर्षी ९८९ मिमी इतका पाऊस झाला होता. यंदा पावसाने एक हजार मिमीचा टप्पा पार केला. तर ४ दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारवी नदीने इशारा पातळी गाठली आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने जांभळी नाका आणि ठाणे मनोरुग्णालय परिसरातील इमारतीच्यावर असलेल्या शेडचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी हे पत्रे धोकादायक स्थितीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आणि त्यातच हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर जास्त प्रमाणात वर्दळ नव्हती.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे आणि कडोंमपा क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सोमवार ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिक्षण विभागाने रविवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती तातडीने पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सकाळच्या सत्रातील काही विद्यार्थी शाळेत पोहोचल्यास त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कल्याण - डोंबिवली महापालिकेअंतर्गत शिक्षण विभागाचा आदेश महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने जारी करण्यात आला असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी त्यावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकांनीही अनावश्यक कारणाशिवाय मुलांना घराबाहेर न पाठविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600