* 'अल निनो'चे अंदाज फोल ठरले
* जिल्ह्यात समाधानकारक पाऊस
ठाणे : अल निनोमुळे संपूर्ण भारतावर यावर्षी दुष्काळाचे सावट असेल असा अंदाज बांधला जात होता, हे सर्व अंदाज फोल ठरवत ठाण्यासह राज्यात जोरदार पाऊस झाला. जून महिन्याची कसर भरून काढत अवघ्या २६ दिवसांत ठाण्यात पावसाने दोन हजार मि.मी.चा टप्पा पार केला तर ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ८८.६४टक्के आणि बारावी धरणात ७३.५८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे.
मागिल वर्षी पावसाने मे महिन्यातच बरसायला सुरुवात केली होती. यावर्षी मात्र पाऊस मे, जून महिना संपत आला तरी देखिल रुसला होता. जूनच्या अखेरीस ठाणेकर उकाड्याने हैराण झाले होते. पाऊस पडायला तयार नव्हता. अल निनोचा फटका ठाण्यासह देशाला बसणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. ठाण्यात तर अल निनोचा धोका ओळखून सर्वसाधारण सभेत अल निनोच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावर जोरदार चर्चा होऊन पाऊस पडला नाही तर आपत्कालीन योजना तयार करण्याचा निर्णय झाला होता. शहरातील विहिरींची साफसफाई करण्यात आली होती. पाणी जपून वापरण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. या योजना सुरु असतानाच पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार बॅटींग करत धोधो बरसायला सुरुवात केली. ही बरसात सुरूच असून मागिल वर्षाच्या तुलनेत दहा दिवस आधीच ठाणे शहरात दोन हजार मि.मी. पाऊस पडण्याचा विक्रम केला आहे.
ठाण्यात आज संध्याकाळी ६.३० पर्यंत २९.९७ मि.मी. पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत २००४.६८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागिल वर्षी १४९६. ६५ मि.मी. पाऊस पडला होता.
यावर्षी पडलेल्या पावसात शेकडो झाडे उन्मळून पडली तर झाड पडून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो चार चाकी आणि दुचाकी गाड्यांचे झाड पडून नुकसान झाले आहे.
उर्वरित जिल्ह्यात देखिल समाधानकारक पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारे भातसा आणि बारवी धरण देखिल भरण्याच्या मार्गांवर आहे. भातसा धरण ८८.६४ टक्के तर बारावी धरण ७३.५८टक्के भरले आहे. आणखी काही दिवस पाऊस जोरदार पडण्याचा अंदाज असल्याने यावर्षाची ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.