जिल्हा
पावसाचा उनाड दिवस!
पावसाचा उनाड दिवस!
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात झाडे पडली, भिंत कोसळली, सखल भागात पाणी साचले
ठाणे: मागिल दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सोमवारी सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने सायंकाळपर्यंत ८५ मिमी एवढी नोंद केली. सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी पावसाचा आनंद घेतला तर पालकांची तारांबळ उडाली. चाकरमान्यांना मात्र कामावर जाण्यासाठी उशीर झाला.
आज पावसाच्या जोरदार माऱ्याने शहरात १२ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शहरातील सखल भाग असलेल्या वंदना सिनेमासमोर, मुख्य बाजारपेठ, वृंदावन सोसायटी, कापूरबावडी आदी ठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे शहरात वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना दिवसभर पडलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला होता.
शनिवारी आणि रविवारी पावसाने सुरुवात केली होती. सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने काही वेळ दमदार हजेरी लावत ठाण्याला झोडपून काढले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ३.५६ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर दुपारी १२ च्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला. त्यानुसार दुपारी १२.३० वाजेपर्यंत २५.९१ मिमी पावसाची नोंद झाली. तर सांयकाळी ४ वाजेपर्यंत ५२ मिमी पावसाची नोंद ठाण्यात झाली. सायंकाळपर्यंत एकूण ८३ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत शहरात ५०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुख्य बाजारपेठ, वंदना सिनेमा रस्ता आणि वृंदावन गृहसंकुल येथील श्रीरंग परिसर, घोडबंदरसह काही सखल ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून रहिवाशांना, वाहन चालकांना वाट काढावी लागली. राबोडी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यालगत झाडाची फांदी पडली. ही फांदी रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार चाकी मोटारीवर पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. कावेसर येथे एका संरक्षण भिंतीवर वृक्ष कोसळले. तसेच लोकमान्य नगर भागात एका सोसायटीची संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. वर्तक नगर भागातील वेदांत कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर झाड पडल्याची घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. या घटनेत कोणलाही दुखापत झालेली नाही. परंतु वाहतूक कोंडी मात्र झाली होती. घोडबंदर मार्गालगत मेट्रो मार्गिकेच्या निमार्णाचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज प्रवाशांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. त्यात सोमवारी पावसामुळे वाहतुक धीम्या गतीने दिसून आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600