जिल्हा
अंबरनाथमध्ये रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा गोंधळ
चुकीच्या उपचारामुळे मुलगा दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप
अंबरनाथ: डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे लहान मुलगा दगावल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी करून गोंधळ घातला. पूर्वेकडील महालक्ष्मी नगर परिसरातील एका खासगी रुग्णालयात शनिवारी नातेवाईकांनी गोंधळ घातल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
पाच वर्षांचा मुलगा या रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी मुलाला पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सायन रुग्णालयात दोन ते तीन दिवस मुलावर उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाला. महालक्ष्मीनगर येथील खासगी रुग्णालयाने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाची प्रकृती खालावली, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरवर केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि काही नागरिक महालक्ष्मीनगर येथील संबंधित खासगी रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी डॉक्टरांकडे प्राथमिक चौकशी केली असता, मुलावर योग्य उपचार सुरू होते, त्यानंतर मुलाची प्रकृती खालावत असल्याने त्यांनी तीन दिवसांपूर्वीच रुग्णाला सायन रुग्णालयात पाठवले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे. तर संबंधित मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेले आरोप डॉक्टरांनी फेटाळले आहेत. शवविच्छेदन अहवालातून सर्व स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया संबंधित डॉक्टरांनी दिली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600