जिल्हा
आनंदी शाळा उपक्रमांतर्गत जि.प.शाळांचे नूतनीकरण
ठाणे: रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या 'आनंदी शाळा' या उपक्रमांतर्गत मुरबाड तालुक्यातील सावर्णे, फांगुळगव्हाण, दिवाणपाडा, गणेशपूर (मोरोशी) येथील चार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे नूतनीकरण करण्यात आले.
या शाळांतील स्वयंपाक गृह, मुलांचे आणि मुलींचे शौचालय, हात धुण्यासाठी बेसिन, संरक्षक भिंत यासारख्या गोष्टींचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच झोपळा, सी-सॉ,घसरगुंडी बसविण्यात आल्या.मुलांसाठी वह्या, पेन्सिल बॉक्स,ड्रॉइंग बुक, क्रेयॉन आणि दप्तर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याचे लोकार्पण रविवार ११ जून २०२३ रोजी ठाणे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी युवराज बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रप्रमुख मंडलिक हिंदुराव, न्याहाडी मुख्याध्यापक अंकुश घरत, स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पवार, पंचायत समिती उपसभापती जया वाख, ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे सदस्य उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन जितेंद्र भांबुरे, प्रकल्प प्रमुख अमोल नाले यांनी शाळांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार प्रकल्पाची आखणी केली. मिलान लबोरोटरिजनी सीएसआर फंड निधी दिला. त्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला. सचिन खेरनार सरांची प्रकल्प पूर्ण करण्यास मोलाची मदत झाली.
युवराज बांगर यांनी रोटरीच्या या उपक्रमाची प्रशंसा करून लोकांना त्याची उपयुक्तता सांगितली आणि भविष्यात आरोग्य आणि कौशल्य विकास यावर लक्ष देण्याची रोटरीला विनंती केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600