जिल्हा
सीएनजी दरवाढीमुळे रिक्षांना हवी भाडेवाढ
सीएनजी दरवाढीमुळे रिक्षांना हवी भाडेवाढ
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: आखाती युद्धामुळे इंधन पुरवठ्याला फटका बसला असून इंधन दरवाढीमुळे ठाण्यातील सीएनजी रिक्षा-टॅक्सी चालकांनी आता भाडेवाढीची मागणी केली आहे. ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ऑटो रिक्षाचे किमान भाडे थेट ३० रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे ३३ रुपये करण्याची मागणी केली आहे.
सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा चालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. वाहनांचे सुटे भाग, दुरुस्ती खर्च, विमा, बँक कर्जाचे हप्ते आणि देखभाल खर्च झपाट्याने वाढल्याने सध्याच्या भाड्यात व्यवसाय परवडत नसल्याची भूमिका संघटनांनी मांडली आहे.
कृती समितीने आरटीओला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने गठीत केलेल्या ‘डी. सी. खटुआ समिती’च्या शिफारशीनुसार महागाई निर्देशांक आणि इंधन दर लक्षात घेऊन दरवर्षी भाडेवाढ देणे आवश्यक आहे. चालकांच्या वाढत्या खर्चाचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली.
ठाणे आरटीओ हद्दीत सध्या ५० हजारांहून अधिक अधिकृत रिक्षा धावत आहेत. ठाणे स्टेशन, घोडबंदर रोड, बाळकूम, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा परिसरात अंतर्गत प्रवासासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षांवर अवलंबून आहेत. त्यामुळे अधिकृत भाडेवाढ मंजूर झाल्यास शेअर रिक्षांच्या दरातही ५ ते १० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600