जिल्हा
विधिमंडळात रमीचा डाव: आव्हाडांचे कृषिमंत्र्यांवर टीकास्त्र
ठाणे: ज्या ऑनलाईन रमी जुगाराने तरुण कर्जबाजारी झाले, आत्महत्या केल्या, तोच जुगार लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे विधिमंडळ सभागृहात कृषिमंत्री खेळतात. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत मंत्रीच असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त करत जोरदार हल्ला केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांना चांगलाच चिमटा काढला आहे. ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, असा खणखणीत टोला त्यांनी लगावला आहे.
एक आमदार गुंड घेऊन विधिमंडळात मारामारी करायला येतो. त्यावेळी जर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडले असते. त्यावेळी मकोका आणि दरोड्यातील पाच गुंड होते. त्यांची नावेही दिली आहेत. मात्र गुन्हा फक्त एकावरच दाखल करण्यात आला आहे. माझे विधानसभाध्यक्षांना आवाहन आहे कि, मार खाणाऱ्याला अटक केली तशीच कारवाई मारणाऱ्या इतर चार गुंडांवर आणि त्या गुंडाना इशारा करणाऱ्यावर का नाही करीत? म्हणूनच मी सभागृहात खेद व्यक्त केला नाही. मला वाईट वाटले हे मी सांगितले. नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे. त्यासाठी मी आणि रोहित पवार रस्त्यावर भूमिका घेऊन उतरलो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला तीन तास इथून-तिथे नाचवले, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे यांच्या जुगाराच्या प्रकरणावर राजीनामा घ्यायला हवा होता. पण, तो घेतला जात नाही. ज्या ऑनलाईन रमीमुळे तरुणांनी आत्महत्या केली. त्या रमीचा डाव मांडला जात आहे, असा डाव मांडणारे धन्य आहेत, असेही डॉ. आव्हाड म्हणाले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600