जिल्हा
आंतरराज्य टोळीच्या संपर्कातील सात दरोडेखोरांना शस्त्रासह अटक
आंतरराज्य टोळीच्या संपर्कातील सात दरोडेखोरांना शस्त्रासह अटक
फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात गुंडांना मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात सर्व आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. हे आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे असू शकतात असा पोलिसांना संशय आहे, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मिरा रोड (पूर्व) येथील पेणकरपाडा परिसरातील सनशाईन हॉटेलजवळ काही संशयास्पद लोक घातक शस्त्रे घेऊन दरोडा टाकण्याच्या योजनेसह जमणार असल्याची गुप्त माहिती दरोडाविरोधी पथकाला मिळाली. या माहितीची खात्री झाल्यानंतर, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल राख यांच्या आदेशानुसार तत्काळ कारवाईसाठी दरोडाविरोधी पथकाने दोन पथके तयार करून सापळा रचला. रात्री ९:३० वाजता म्हाडा इमारतीच्या गेटजवळ रस्त्याच्या कडेला दोन संशयास्पद वाहने उभी असलेली दिसली. निळ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट (MH-04-DS-5757) आणि काळ्या रंगाच्या महिंद्रा थार (MH-04-LJ-9080) मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच, महिंद्रा थारच्या चालकाने गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, टीम क्रमांक २ च्या अधिकाऱ्यांनी वेळीच सौम्य बळाचा वापर करून गाडी थांबवली आणि दोन्ही वाहनांमध्ये उपस्थित असलेल्या एकूण सात जणांना ताब्यात घेतले.
या संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे स्टील पिस्तूल (मॅग्झिनसह), आठ जिवंत पितळी गोळ्या, दोन फायटर पंच, दोन कापसाचे दोरे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध काशिमीरा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३१० (४) (५) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सात आरोपींपैकी रोहित वनकर उर्फ परमार हा व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे बिश्नोई टोळीशी जोडला गेला असल्याचा संशय आहे. पोलिस या दृष्टिकोनातूनही तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600