जिल्हा
गायिका आशा खाडिलकर यांना पं. संगीतभूषण राम मराठे पुरस्कार
गायिका आशा खाडिलकर यांना पं. संगीतभूषण राम मराठे पुरस्कार
फोटो: ठाणे वैभव
रंगायतनमध्ये ५ डिसेंबरपासून रंगणार संगीत समारोह
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 या दरम्यान 30 वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे. सायंकाळी 7 वाजता महोत्सवाची सुरूवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पं. मुकुंद मराठे, पं. मुकुंद देव, पं. विवेक सोनार, तबलावादक रवी नवले उपस्थित होते.
शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायनप्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या व आपल्या आवाजातील माधुर्य, श्रुतीसाधना, स्पष्ट उच्चार व भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडीलकर यांना संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये 51 हजार रुपये सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कथ्थक या अभिजात भारतीय नृत्यप्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पं. राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 25 हजार सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री 8 वाजता होणार आहे. तद्नंतर रात्री 8.30 वाजता पं. सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास चितळे व हार्मोनियमवर नीला सोहोनी साथसंगत करणार आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 राजेंद्र गांगाणी यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण आहे. रात्री. 8 वाजता गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. त्यांना तबल्यावर रोहित देव, तर हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर साथसंगत करणार आहे. तर रात्री 9.45 वा. उस्ताद शाहीद परवेझ यांचा सितारवादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी साथसंगत करणार आहेत.
रविवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता वैशाली पोतदार यांच्या नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. सकाळी 11 वाजता सावनी पारेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर अथर्व आठल्ये तर हार्मोनियमवर अमेय गांधी साथसंगत करणार आहे. दुपारी 12 वाजता पं. अनंत जोशी यांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना समीर गानू, अक्षय अभ्यंकर, अभय दातार साथसंगत करणार आहेत. तर दुपारी 3 वाजता वाघांबे, गुहागर येथील संवेदना आर्टस निर्मित ‘जय जय गौरीशंकर’ हे संगीत नाटक सादर होणार आहे. रात्री 8 वाजता पं.सुरेश तळवलकर हे वादन सादर करणार असून त्यांना सावनी तळवलकर- तबल्यावर अभिषेक शिनकर, हार्मोनियमवर नागेश आडगावकर, गायनासाठी रोहित खवळे, पखवाजवर ईशान परांजपे, कहोजवर ऋतुराज हिंगे, तर अभिषेक भुरूक ड्रम्सवर साथसंगत करणार आहे. रात्री 9.30 वाजता पं. राजा काळे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर मंदार पुराणिक तर हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर साथसंगत करणार असून या कार्यक्रमाने समारोहाची सांगता होणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600