जिल्हा
ठामपाच्या उत्पन्नवाढीसाठी सीताराम राणेंचा फॉर्म्युला
अकृषिक करापोटी हिस्सा, सुविधा भूखंडांतून उत्पन्न आणि नियमित करदात्यांना प्रोत्साहन
ठाणे: ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ठोस आणि व्यावहारिक उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करत भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत अकृषिक करापोटी हिस्सा, सुविधा भूखंडांतून उत्पन्न आणि नियमित करदात्यांना प्रोत्साहन आदी माध्यमातून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या सूचना केल्या.
ठाणे महापालिकेने कोणत्याही प्रकारची करवाढ किंवा दरवाढ न करता २०२६-२७ साठी ६,२२१ कोटी १२ लक्ष इतक्या रक्कमेचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील अर्थसंकल्पीय चर्चेत भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध ठोस उपाय सुचवले आहेत. शहरातील सुविधा भूखंडांवर उभारलेल्या इमारती तात्काळ महापालिकेच्या ताब्यात घेऊन नागरिकांसाठी खुल्या केल्यास महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा संदर्भ देत राणे म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुविधा भूखंडांवर उभारलेल्या इमारती अद्याप नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या नाहीत. या इमारतींमध्ये विविध सार्वजनिक सुविधा सुरू केल्यास उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. याकडे लक्ष वेधले.
याशिवाय, राज्य शासनाने अकृषिक कराच्या थकबाकीवर दंडासह माफी देऊन एकरकमी रूपांतरण अधिमूल्य निश्चित केले आहे. या योजनेतून जमा होणाऱ्या रक्कमेपैकी ३० ते ५० टक्के हिस्सा महापालिकांना मिळणार असल्याने, ठाणे महापालिकेने याची अचूक माहिती घेऊन ती रक्कम अर्थसंकल्पात समाविष्ट करावी, अशी सूचनाही राणे यांनी प्रशासनाला केली.
दरम्यान, यावर्षी महापालिकेने थकीत करांवरील शास्ती रकमेवर ९० टक्के सूट दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना राणे यांनी, नियमित आणि वेळेवर कर भरणाऱ्या करदात्यांबाबत आदरयुक्त भावना व्यक्त करीत वारंवार अभय योजना तसेच, शास्ती माफी दिल्यास प्रामाणिक करदाते निरुत्साही होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली. अंदाजे १.२० लाख करदात्यांकडून शास्तीपोटी सुमारे १५० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र शास्ती माफीमुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, माफ करण्यात आलेल्या रकमेपैकी ३० ते ४० टक्के रक्कम नियमित कर भरणाऱ्यांना अशी सवलत म्हणून देण्यात यावी, अशी अभिनव सूचना सीताराम राणे यांनी मांडली.
सध्या आगाऊ कर भरणाऱ्यांना फक्त सामान्य कर घटकावर १० टक्के सवलत दिली जाते, जी एकूण बिलाच्या केवळ ३ ते ४ टक्केच ठरते. ही सवलत अत्यंत तुटपुंजी असल्याचे नमूद करत, अधिक आकर्षक सवलती दिल्यास कर भरणाऱ्यांची संख्या वाढेल आणि महापालिकेचे उत्पन्नही लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. नियम पाळणाऱ्या करदात्यांना प्रोत्साहन आणि थकबाकीदारांवर कठोर धोरण, राबवल्यास महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
संस्थांचाही सन्मान व्हावा
सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ठाणे शहरातील नागरिकांसाठी महापालिका ‘ठाणे भूषण’, ‘ठाणे गौरव’, ‘गुणीजन’ यांसारखे पुरस्कार जाहीर करते. या अनुषंगाने, शहराच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवात मोलाचा वाटा उचलणाऱ्या संस्थांचाही अशाप्रकारे गौरव व्हावा, अशी मागणी भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600