महाराष्ट्र
विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सोमवारपासून विशेष मोहीम
विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी सोमवारपासून विशेष मोहीम
फोटो: ठाणे वैभव
मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलले असून, लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये सोमवारपासून ‘केंद्रित तिकीट तपासणी मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.
मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांना सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सर्व प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात करण्यात येणार आहे. हे पथक प्रत्येक लोकलच्या सर्व डब्यांतील प्रवाशांच्या तिकिटांची सखोल तपासणी करणार आहेत.
विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रवासादरम्यान दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंड भरण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून तेथील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येईल व गरज भासल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
मध्य रेल्वेने ही मोहीम यापूर्वी वातानुकूलित लोकलमध्ये राबवली होती. तसेच आता प्रथम श्रेणी तिकीटधारक प्रवाशांचे हक्क सुरक्षित ठेवणे. सातत्यपूर्ण तपासणीद्वारे विनातिकीट प्रवाशांना रोखणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. प्रवाशांनी वैध तिकीट अथवा पास घेऊनच प्रवास करावा आणि तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600