न्यूजलेटर्स

विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि वाचकप्रिय लेखिका : नूतन बांदेकर

विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि वाचकप्रिय लेखिका : नूतन बांदेकर
विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि वाचकप्रिय लेखिका : नूतन बांदेकर फोटो: ठाणे वैभव
शिक्षण, समाजकार्य, पर्यावरण आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या नूतन गजानन बांदेकर या ठाणे शहरातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. ठाणे महानगरपालिका शाळा क्र.५३ येथून मुख्याध्यापिका पदावरून नुकत्याच त्या सेवानिवृत्त झाल्या. तब्बल ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना घडवले नाही, तर शाळा, समाज आणि शहराशी नाते जोडणारे कार्य सातत्याने केले. 'ठाणेवैभव'मध्ये सलग आठ वर्षे 'मनतरंग' या लोकप्रिय सदरातून त्या वाचकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. पुढारी, लोकमत यांसारख्या वृत्तपत्रांतूनही त्यांचे लेखन नियमितपणे प्रसिद्ध होत असल्याने वृत्तपत्र लेखिका म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. महानगरपालिका शाळांतील कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, हे त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले. शाळेची घटती विद्यार्थीसंख्या वाढावी म्हणून त्यांनी शाळेपासून तीन-चार किलोमीटर दूर असलेल्या तुर्फापाडा व धर्माचापाडा परिसरात जाऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या सुमारे दीडशे मुलांना शाळेत दाखल करून घेतले. बंद पडण्याच्या मार्गावर असलेली मराठी माध्यमाची शाळा त्यांनी पुन्हा उभी केली. या विद्यार्थ्यांची दैनंदिन ये-जा सुलभ व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाकडून विशेष बससेवा सुरू करून घेतली. सुरुवातीला स्वतः आर्थिक भार उचलून आणि 'उडान वेल्फेअर फाउंडेशन'च्या सहकार्याने मोफत बस पासेसची व्यवस्था केली. पुढे त्यांच्या प्रयत्नांतून महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पासेस देण्याची योजना अस्तित्वात आली. कृतीतून शिक्षण देण्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. विविध उपक्रम, कार्यशाळा आणि शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत पर्यावरण शिक्षणाची जोड दिली. 'हिरवे स्वप्न' आणि 'मातृसेवा संस्था' यांच्या सहकार्याने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून शाळेच्या टेरेसवर मातीविरहित बाग निर्माण करण्यात आली. सुक्या पालापाचोळ्यापासून माती, ओल्या कचऱ्यापासून खत, कांद्याच्या सालींपासून कीटकनाशक, केळ्यांच्या सालींपासून खत, नारळाच्या शेंडीपासून कोकोपीट निर्मिती असे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेतले गेले. टाकाऊ प्लास्टिकच्या वस्तूंच्या पुनर्वापरातून 'शून्य खर्च-शून्य कचरा' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या उपक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी Climate Action Project या जागतिक पातळीवरील उपक्रमात केले. विविध देशांतील शाळांशी ऑनलाईन संवाद साधत पर्यावरण विषयक काम मांडण्यात आले. 'माझी वसुंधरा ०.२' स्पर्धेत शाळेला अव्वल स्थान मिळाले. महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच दरवर्षी महिलादिनाचे कार्यक्रम त्या नियमितपणे आयोजित करतात. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी पदरमोड करून सुमारे तीनशे कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. 'उडान वेल्फेअर फाउंडेशन'च्या माध्यमातून परिसरातील मुलांना पौष्टिक आहाराचे वाटपही सातत्याने केले. याच काळात त्यांनी 'ठाणेवैभव'मध्ये सकारात्मक लेखमालेतून समाजाला मानसिक आधार दिला. आपत्कालीन व्यवस्थापन विषयाच्या मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी यशदा, पुणे येथे तसेच विविध महानगरपालिका व जिल्हा परिषदांमध्ये प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे चार ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले असून कथा, कविता, बालनाट्ये असे विविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून त्यांच्या लेखनाचे अभिवाचन कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. ठाणे शहराबद्दल विशेष आस्था ठेवत त्यांनी 'तलावांचे शहर ठाणे' ही लेखमाला लिहिली. ठाणे महानगरपालिका हद्दीतील ४२ तलावांचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यांच्या सद्यस्थितीचे आणि ऐतिहासिक महत्त्वाचे दस्तऐवजीकरण त्यांनी केले. या लेखमालेतून 'माझा तलाव' मोहीम सुरू झाली आणि अनेक तलावांच्या पुनरुज्जीवनाला चालना मिळाली. शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या, लेखिका म्हणून समाजमन जागृत करणाऱ्या आणि कार्यकर्ती म्हणून माणुसकी जपणाऱ्या नूतन बांदेकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन त्यांचे योगदान विद्यार्थ्यांच्या यशात, संवर्धित पर्यावरणात आणि जागृत समाजात स्पष्टपणे दिसून येते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600