जिल्हा
आग लागलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका
आग लागलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका
फोटो: ठाणे वैभव
* वाहतूक पोलिसांची सतर्कता
* विरार उड्डाणपुलावरील घटना
वसई : विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज सकाळी शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक वाहनाला आग लागल्याची घडली. वाहनात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी जळत्या वाहनातून शाळकरी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वसई-विरारमध्ये बहुतांश शाळकरी विद्यार्थी शाळेच्या बसेस, रिक्षा तसेच टाटा मॅजिक यांसारख्या वाहनातून प्रवास करतात. आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक टाटा मॅजिक वाहन विरार येथील चंदनसार रस्त्याकडून पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून चालले होते. पण, वाहन सुरू असताना अचानक चालत्या वाहनाला आग लागली. यामुळे पुलावरून चालणारे पादचारी आणि वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार कैलास कोकाटे आणि पोलीस शिपाई सुभाष जाधव यांनी वेळेत धाव घेत तत्परतेने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठा अपघात टळला.
यावेळी पोलिसांनी ७ ते ८ मुलांना या वाहनातून बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. तर वाहनाची तपासणी केली असता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600