महाराष्ट्र
नववर्ष स्वागतयात्रेची जय्यत तयारी
श्री कौपिनेश्र्वर सांस्कृतिक न्यासाचा उपक्रम
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ठाणे शहरात स्वागत यात्रा निघणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिवर्षीप्रमाणे स्वागतयात्रेत सहभागी होतील तर स्वागताध्यक्ष म्हणून जेनरिक फार्मा व्यवसायाचे जनक अर्जुन देशपांडे लाभलेले आहेत.
सकाळी ठीक ७ वाजता श्रीकौपिनेश्वर पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल. प्रथम ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभळी नाका-रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील. त्यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रुपांतर भव्य अशा स्वागतयात्रेत होईल. ही स्वागतयात्रा पुढे आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल, पुढे राममारुती मार्ग, पु. ना. गाडगीळ चौक, तलाव पाळी मार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात येईल. मंदिरात आरती व प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
तीन दिवसीय कार्यक्रम हे कौपिनेश्वर मंदिराचे मागील प्रांगणात पार पडणार आहेत. कार्यक्रमास रोज साधारण ३५० ते ५०० रसिकांची उपस्थिती असणार आहे.
श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत यंदा प्रबोधन करणारे सायकलस्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, ड्रम-झेंबे वादन, एरियल कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणारे चित्ररथ यांमधून समर्थ भारत, श्रेष्ठ भारताचे दर्शन घडणार आहे. राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे ३५० वा राज्याभिषेक दिनानिमित्ताने राज्याभिषेक दिन महत्व चित्ररथ, सन्मान स्त्रीशक्तीचा, जागर नारीशक्तीचा इत्यादी विषय घेऊन महिला बाईक रॅली सहभागी होणार आहेत.
शनिवार ६ एप्रिल २०२४ पासून पुढील चार दिवस शाळा क्र.१९, विष्णू नगर, नौपाडा, येथे ऐतिहासिक आरमार प्रदर्शन शिवाजी महाराजांच्या कालावधीत वापरल्या जाणाऱ्या आरमाराच्या छोट्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
स्वागतयात्रेत आम्ही सायकल प्रेमी संस्था, व्हील्स अँड बॅरेल्स या संस्थांचे सायकलस्वार पारंपारिक वेशभूषते सहभागी होणार आहेत. तसेच स्वागतयात्रेत पारंपारिक वेश करून १०० हून अधिक महिलांची बाईक रॅली निघणार आहे. सुमारे ६० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असून 'सामाजिक', 'सांस्कृतिक', 'शैक्षणिक', 'पर्यावरण', ठाणे महानगरपालिकेतर्फे 'घनकचरा व्यवस्थापन', 'पाणी पुरवठा विभाग' 'प्रदूषण नियंत्रण कक्ष' यांचा विशेष सहभाग असेल, 'प्लास्टिक बंदी', 'अवयवदानावर जनजागृती' 'मतदान जागृती' हा विषय अनेक संस्थांनी नववर्ष स्वागत यात्रेसाठी घेतला आहे. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ (शिवाजी महाराज या विषयावर सादरीकरण करतील). ह्या वर्षी प्रथमच अनाहत म्युझिक संस्था तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईन व आर्किटेक्ट ह्यांचा सहभाग होणार आहे. यांसारखे नाविन्यपूर्ण विषय हाताळणी करणारे चित्ररथ हे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी १०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहतील.
'संस्कार भारती' या संस्थेतर्फे गावदेवी मैदान येथे रांगोळी साकारण्यात येईल. तर स्वागतयात्रेच्या दिवशी सेल्फी विथ स्वागतयात्रा, फोटोग्राफी स्पर्धा फोटो सर्कल सोसायटीतर्फे, तर पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ स्पर्धा, रिल स्पर्धा श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
स्वागतयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैठकीला स्वागताध्यक्ष श्री. अर्जुन देशपांडे, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, कार्यकारणी अध्यक्ष उत्तम जोशी, विश्वस्त संजीव ब्रह्मे, डॉ. अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, सहनिमंत्रक विनित आश्रित, निखिल सुळे आणि कुमार जयवंत आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600