जिल्हा
रक्त घ्या, पण पाणी द्या
अंबरनाथला काँग्रेसचा जलआक्रोश मोर्चा
अंबरनाथ: पावसाळ्यात धरणे ओव्हर फ्लो होऊनही अंबरनाथ पश्चिमेला काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवरून काँग्रेसने आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मोर्चा निघण्यापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त घ्या पण पाणी द्या, अशी भावनिक साद घालण्यात आली.
अंबरनाथच्या पश्चिम भागातील कोहोजगाव, फुलेनगर, जावसई, महेंद्रनगर, उलनचाळ आदी परिसरात भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाई विरोधात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार (28) एप्रिल रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अंबरनाथ काँग्रेस कार्यालयापासून पाणी खात्याच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चामध्ये नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चा निघण्यापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्त घ्या, पण पाणी द्या, असे आवाहन करण्यात आले.
पावसाळ्यात धरणे भरून वाहू लागतात, काही भागात पुरेसे पाणी तर काही भागात पाणीसमस्या जाणवते. पाणी मुरते कुठे असा सवाल उपस्थित करून याला जबाबदार कोण असे खडे बोल ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सुनावले. कोहोजगाव, फुलेनगर आदी परिसरात अनियमित पुरवठा करण्यात येत असल्याने महिलाप्रमाणे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतो. पाणी टंचाईच्या समस्येबाबत वारंवार आंदोलने केली, त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो, मात्र नंतर परिस्थिती जैसे थे होते. पाण्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नसेल तर एमआयडीसीकडे पाणीपुरवठा सोपवावा, पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. पाटील यांनी दिला. आज मोर्चा निघणार म्हणून सकाळीच पाणी पुरवठा सुरु कसा केला असा सवाल यावेळी विचारण्यात आला.
ब्लॉक अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेश पाटील, मिलिंद पाटील, पंकज पाटील, चरण रसाळ, विलास जोशी आदींच्या उपस्थितीमध्ये पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगर यांची भेट घेतली. पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी अशी मागणी केली. पाणीटंचाई भेडसावणाऱ्या भागात तांत्रिक सुधारणा करण्याचे काम सुरु असून लवकरच पाणी पुरवठ्यात सुधारणा करू, असे आश्वासन कार्यकारी अभियंता मिलिंद बसनगार यांनी दिले.
सध्या उन्हाचे प्रमाण वाढले असल्याने आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी छत्री घेऊन यावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. मजीप्रा कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600