महाराष्ट्र

वेळेत मालमत्ता कर भरल्यास दहा टक्के सवलत

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम १ एप्रिलपासूनच सुरु केली आहे. त्यानुसार करदात्यांच्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून महापालिकेने बिले पाठविण्यास सुरवात केली आहे. याशिवाय १५ जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात १० टक्के सुट देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मागील सरत्या आर्थिक वर्षात सहा टक्के कमी वसुली केल्याचे दिसून आले आहे. या विभागाला २०२३-२४ मध्ये ७५० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र आर्थिक वर्ष संपत आले तेव्हा मालमत्ता कर विभागाने ७०३.९३ कोटींची वसुली केली आहे. यंदा देखील मालमत्ता कर विभागाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा या विभागाला ८१९.७१ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आता हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने १ एप्रिलपासूनच सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या या विभागामार्फत करदात्यांना देयके व कर भरण्याच्या लिंकसह एसएमएसद्वारे पाठविण्यात आली. मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. याशिवाय करदात्यांना पहिल्या टप्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील महापालिकेने जाहीर केली आहे. त्यानुसार जे करदाते २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जून,२०२४ पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यानुसार १५ जूनपर्यंत रक्कम भरल्यास १० टक्के सुट दिली जाणार आहे. तर १६ जून ते ३० जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास ४ टक्के, १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत भरल्यास ३ टक्के आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600