जिल्हा
नाल्यांना पूर येण्याआधीच ठामपाला मिळणार सूचना
नाल्यांना पूर येण्याआधीच ठामपाला मिळणार सूचना
फोटो: ठाणे वैभव
* आठ नाल्यांवर सेन्सर यंत्रणा
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी
ठाणे: ठाणे शहरातील नाल्यांना पूर आल्यास त्याची तत्काळ माहिती ठाणे महापालिकेला मिळावी यासाठी आठ नाल्यांवर सेन्सर यंत्रणा बसविण्यात आली असून ५२ नाल्यांवर २४ तास कामगार तैनात करण्यात येणार आहेत. शून्य जीवितहानी हेच लक्ष्य असल्याचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महापालिका हद्दीतील मोठ्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अशा आठ नाल्यांवर सेन्सर यंत्रणा बसविण्यात आली आहे. नाल्याचे पाणी धोकादायक स्थितीमध्ये आल्यावर त्याची तत्काळ माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळेल आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यावर केले.
शून्य जीवितहानी हे आपले लक्ष्य आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवली, तक्रार आली तर कमीत कमीत वेळेत प्रतिसाद देऊन, यंत्रणांनी मदतीसाठी तत्पर असावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून ठाणे महापालिकेने पावसाळ्यातील स्थितीचा चांगल्या पद्धतीने सामना केला आहे, असेही ते म्हणाले.
ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन सत्रांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती स्तरावरही कार्यपद्धती तयार करण्यात आलेली आहे. तेथे मनुष्यबळ, वाहन, जेसीबीची उपलब्धता आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ३८ ठिकाणी उच्च क्षमतेचे ६६ पंप बसवण्यास आलेले आहेत. आतापर्यंत एकूण १३५ मि.मी. पाऊस झाला. पण पाणी साठण्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. जिथे थोडेफार होते तेही पंपांच्या मदतीने काढण्यात आले, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ठाणे महापालिका क्षेत्रात सहा ठिकाणी पर्जन्यमापक, आठ नाल्यांवर फ्लड सेंसर कार्यरत आहेत. ५२ संभाव्य ठिकाणी पाऊस पडत असताना कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, २९ जवानांचे टीडीआरएफ पथकही तैनात असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. सी वन गटातील अतिधोकादायक ९० इमारतींपैकी ४२ इमारती रिकाम्या आहेत. सहा इमारतीतून रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले आहे. तसेच, १९७ कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून येणाऱ्या संदेशावर लक्ष ठेवावे. तसेच, असुरक्षित स्थळी आसरा घेऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावेळी, उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामाची माहिती घेतली. त्याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, अनघा कदम आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600