जिल्हा
ठाण्यात भाजपातर्फे उद्यापासून `घर चलो अभियान'
ठाणे : भाजपातर्फे देशभरात `गाव चलो अभियान' राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर भाजपातर्फे शहरात ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'घर चलो अभियान' राबविण्यात येणार आहे.
भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष संजय वाघुले, भाजपाचे सरचिटणीस आणि अभियानाचे संयोजक मनोहर सुखदरे, सचिन पाटील, सहसंयोजक जयेंद्र कोळी यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला असून, सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. त्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाला ४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून, ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ११ फेब्रुवारी रोजीच्या स्मृतीदिनापर्यंत सुरू राहील. पंडित दिनदयाळ यांच्या स्मृतींना अभियान समर्पित केले जाणार आहे.
या अभियानात पक्षाचे शहरातील माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्टचे संयोजक, वॉरियर्स, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष आदी सहभागी होणार आहेत.
या अभियानात सहभागी कार्यकर्त्यांना `प्रवासी कार्यकर्ता' म्हणून संबोधण्यात येणार आहे. तर शहरातील एक हजार मतदारांच्या बूथवरील लाभार्थीपर्यंत पोहोचणार आहेत. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोचविण्यात येईल. तसेच पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकाला माहितीपत्राद्वारे सांगण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600