जिल्हा

''छात्रों की गूंज'मधून ठाणे काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार

''छात्रों की गूंज'मधून ठाणे काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार
''छात्रों की गूंज'मधून ठाणे काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार फोटो: ठाणे वैभव
ठाणे : राहुल गांधी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या 'छात्रों की गूंज' या देशव्यापी अभियानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा काँग्रेसने एनईईटी-यूजी २०२६ पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज बुलंद केला. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेल्या अन्यायाचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत एनईईटी-यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी वारंवार खेळ करणाऱ्या परीक्षा व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना ठाणे शहर  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी सांगितले की, पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अनियमितता यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करूनही अशा गैरप्रकारांमुळे त्यांचे भविष्य अंधारात जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या गंभीर प्रकारांमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला असून, ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या अपयशाची बाब असल्याचा आरोप करण्यात आला.
ठाण्यात यापूर्वी टीईटी पेपरफुटीची घटना घडल्याचा उल्लेख करत, अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पेपरफुटीमागील सूत्रधार, संबंधित अधिकारी, परीक्षा माफिया आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसह संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे पुनर्गठन करून स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याचाही आग्रह करण्यात आला.या पत्रकार परिषदेस विजेता अकॅडमीचे संचालक सतीश जाधव सर, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, ब्लॉक अध्यक्ष अजिंक्य भोईर, मनोज दुबे, राजेश मिश्रा, तरुण सिंग, ॲड. मनोज डाकवे, गोपाळ सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते
'छात्रों की गूंज' अभियानांतर्गत ३० जूनपासून देशातील २८ शहरांमध्ये विद्यार्थी संपर्क, पत्रक वाटप, जनजागृती मोहीम, महाविद्यालये व वाचनालयांमध्ये संवाद, तसेच पुढील टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे आणि 'दिल्ली चलो' आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600