जिल्हा

एकदिशा मार्ग बिघडवणार ठाणेकरांचे वेळापत्रक

  • * तीन हात नाका ते ठाणे स्थानक मार्ग एकेरी करण्याच्या हालचाली * प्रवास होणार पाचऐवजी १५ मिनिटांचा
ठाणे: वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन हात नाका ते ठाणे स्थानकापर्यंतचा मार्ग एक दिशा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे ठाणेकरांचे वेळापत्रक आणखी बिघडणार असून पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल १५ मिनिटे खर्च होणार असल्याने स्थानिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. यापूर्वीही वाहतूक विभागाने हा प्रयोग केला होता. तो फसल्यानंतरही पुन्हा या एकदिशा मार्गाचा हट्ट धरण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. ठाणे शहरात विशेषत: कोपरी आणि नौपाड्यामध्ये सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक विभागाने पुन्हा एक दिशा मार्गाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार तीनहात नाका, एलबीएस रोड ते हरिनिवास सर्कल येथून ठाणे स्थानकापर्यंतच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या नियोजनानुसार तीनहात नाका येथून स्थानक दिशेने जाणारी वाहने हरिनिवास सर्कल येथून उजवीकडे वळून छत्रपती संभाजी महाराज पथ पुढे डावीकडे वळून सरळ शेगाव कचोरी ते सत्यम कलेक्शनच्या दिशेने जातील. तेथून पुढे प्रजापिता ब्रम्हकुमारी चौकपासून उजवीकडे वळून कलाकेंद्रपर्यंत एकदिशा जातील. पुढे याच मार्गावरून उजवीकडे वळून गोखले रोडने पुढे टेलीफोन नाका ते मल्हार सिनेमा दिशेने तीनहात नाकापर्यंत वळतील. तीनहात नाका येथून मल्हार रोडने पुढे गोखले रोडने स्टेशनकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हरिनिवास सर्कल येथून टेलीफोन नाका डावीकडे वळून गोखले रोडने स्थानकाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा एकदिशा मार्ग तीनहात नाका ते स्थानक परिसरापर्यंत जाणार्‍यांसाठी सोयीचा ठरणार असला तरी हरिनिवास सर्कल परिसरातील तसेच या दिशेने येणार्‍या नागरिकांना मात्र तापदायक ठरणार आहे. कारण सर्कल ते तीनहात नाका हे अंतर अवघ्या पाच मिनिटांचे आहे. या एकदिशा मार्गामुळे नागरिकांना वळसा घालून पुढील प्रवास करावा लागणार आहे. यासंदर्भात हरकती सुचना घेण्यासाठी वाहतूक विभागाने बोलावलेल्या २४ एप्रिलच्या बैठकीमध्येही हाच सूर उमटला. अनेक नागरिकांनी या एकदिशा मार्गाला विरोध यावेळी केला. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी हाच प्रयोग करण्यात आला होता. तो अशस्वी झाल्यानंतरही पुन्हा तोच अट्टाहास का असा सवाल माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी केला. त्यापेक्षा येथील अनधिकृत पार्किंग, रिक्षांचे अनधिकृत थांबे आणि फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, म्हणजे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले. नागरिकांच्या मागण्या मान्य न करता जबरदस्तीने एकेरी वाहतूक बदल लादला तर मागच्या वेळी जसा मोर्चा काढला तसा यावेळी देखिल काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. या बैठकीला माजी नगरसेवक संजय वाघुले, राजेश मढवी, व्यापारी प्रतिनिधी हितेश शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक क्षत्रिय आणि राजहंस, परम सुख, उत्तुंग सोसायटी आदी पदाधिकारीही उपस्थित होते. या एकदिशा मार्गामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याने आठवड्याभरात ही व्यवस्था सुरू केली जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600