जिल्हा
ठाण्यात विरुद्ध दिशेने वाहन हाकण्याचे प्रमाण वाढले!
* दररोज ५०० गुन्हे दाखल
* गत वर्षाच्या तुलनेत दंड वसुलीत २० टक्के वाढ
ठाणे: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका बहुचर्चित वाहतूक नियमांचे उल्लंघन या समस्येवर ठाणे वाहतूक पोलिसांनी अखेर कारवाई सुरू केली आहे. गेल्या दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहन हाकणाऱ्या जवळजवळ दहा हजार लोकांवर संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
'ठाणेवैभव'शी बोलताना वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले की, 'मुदतीपेक्षा जास्त पडलेला पाऊस आणि दिवाळीचा बंदोबस्त यामुळे ही मोहीम सुरू करण्यास उशीर झाला होता. गेल्या १५ दिवसांत सरासरी दररोज ४०० ते ५०० वाहन चालकांविरुद्ध आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत. १५०० रुपये दंडाची तरतूद असलेल्या या कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये शिस्त येईल ही अपेक्षा आहे. दंड भरण्यास विलंब झाला तर आम्ही त्यांचा परवाना जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.'
ठाणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक स्वागत करत आहेत. 'ठाणेवैभव'शी बोलताना एका ज्येष्ठ नागरिकाने आता रस्त्यावरून चालणे सुरक्षित होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 'रस्ता ओलांडताना आधी उजवीकडे आणि मग डावीकडे पाहतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये या सवयीला मुरड घालून आपण जीवावर उदार होऊन रस्ता ओलांडत होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आत्मविश्वास गमावला होता आणि अपघाताच्या भीतीने त्यांना ग्रासले होते. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे रस्ता ओलांडणे आणि रस्त्यावरून चालणे सुकर होईल,' असे हे नागरिक म्हणाले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत सुमारे सात कोटी रुपये दंडपोटी जमा झाले होते. हीच रक्कम हे वर्ष संपायला दीड महिना असताना आठ कोटींवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत बोलताना वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट म्हणाले, दंडाची रक्कम वाढणे ही कौतुकास्पद बाब नाही. याचा अर्थ वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि ही चिंतेची बाब आहे. दंड कमी वसूल व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी वाहन चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600