जिल्हा
हापूसची आवक वाढली, दर येणार आवाक्यात
हापूसची आवक वाढली, दर येणार आवाक्यात
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: गुढी पाडव्यापर्यंत कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी होत असल्याने दरही वधारलेले होते. मात्र सोमवारी बाजारात कर्नाटक आंब्यापेक्षा कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात देखील १५ ते २० टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले.
सोमवारी बाजारात कर्नाटकमधून एक लाख २७,६१७ तर कोकणातून १३,९३० आंबा पेट्यांची आवक झाली आहे.
यंदा पावसाचे प्रमाण वाढल्याने तसेच थंडीमुळे व मोहर भरात असताना आंब्यावर रोग पडल्याने कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे बाजारात हापूस आंब्याची आवक कमी होत होती. वाशी बाजारात मार्च महिन्यात हापूस आंब्याच्या मुख्य हंगामाला सुरुवात होऊन आवक ३० हजारांच्या घरात जाते. तर गुढी पाडव्याच्या सणाला देखील आंब्यांची मागणी अधिक असल्याने आवक वाढत असते. मागील वर्षी पाडव्याला ४० हजार पेट्या आंबा दाखल झाला होता. यंदा मात्र १३ हजार पेट्या दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आता बाजारात हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली असल्याने दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ३ ते ५ डझन पेटीला अडीच हजार ते नऊ हजार दर होता. सोमवारी दोन हजार ते सहा हजार रुपये भाव होता. कर्नाटक आंबा हा ६०० ते ७०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत होता. १ एप्रिलपासून हापूस आंब्याच्या आवकमध्ये वाढ होणार असून दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600