महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही
शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीचा युती सरकारवर हल्लाबोल
ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे या महिलांचा बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसून असे खटले फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने दिला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळी फीत लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला. यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, मा. नगरसेविका नंदिनी विचारे, ॲड. आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, ज्योती कदम, छाया अमृगम, अनिता प्रभू, वासंती राऊत, सुप्रिया गायकर, ॲड. आरती खळे, ॲड. पूजा भोसले, भारती गायकवाड, सायली साळवी, वंदना पवार व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
गेल्या दोन वर्षांत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात सराईत गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. महिला असुरक्षित आहेत. राज्याचे गृहखाते व पोलीस यंत्रणा काय करीत आहेत? असा सवाल माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी केला. अपुऱ्या पोलीस बळामुळे पोलीस खाते हतबल झाले आहे. प्रामुख्याने ठाण्यातील पोलिसांचे बळ सत्तेतील राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना व गुंडांना सुरक्षा देण्यात व्यस्त असल्याने महिलांचे मंगळसूत्र चोरी, छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी २४ तास रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600