जिल्हा
ठाण्यात पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
* रक्तदाते दिवाळीच्या सुट्टीवर
* रक्तपेढ्यांमध्ये तुटवडा
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील सहा सरकारी रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला असून रक्तदातेही दिवाळीच्या सुट्टीवर असल्याने फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. अपघातग्रस्त, कॅन्सरग्रस्त, गरोदर माता आणि डायलिसिस रुग्णांना रक्ताची निकड भासू लागल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणार्या रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने येत्या काही दिवसात मुबलक रक्तसाठा न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे.
जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालय, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई पालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका या सहा ठिकाणी सरकारी रक्तपेढ्या आहेत. मात्र सहा सरकारी रक्तपेढ्यांमधील साठा कमी झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे.
रुग्णांच्या शस्त्रक्रिया, अपघात, महिलांना प्रसूतीवेळी रक्ताचा पुरवठा रुग्णालयांना करावा लागतो. सध्या जिल्ह्यातील रुग्णालये विविध साथीच्या आजारांनी फुल्ल झाले आहेत. त्यातच अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासू लागल्याने रक्त मिळवण्यासाठी नातेवाईकांना जिल्ह्याबाहेर वणवण भटकावे लागत आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरूणींनी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करावयाचे असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी (९८६९६८५२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600