जिल्हा
मध्यवर्ती रुग्णालयाचे विस्तारीकरण होणार
मध्यवर्ती रुग्णालयाचे विस्तारीकरण होणार
फोटो: ठाणे वैभव
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
उल्हासनगर: उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयाचे विस्तारीकरण करून ते ५०० खाटांचे करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी दौऱ्यादरम्यान केली.
उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालय आणि नव्याने उभारण्यात आलेल्या कामगार रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी श्री.आबिटकर यांनी केली. यावेळी त्यांनी नव्याने उभारण्यात आलेले कामगार रुग्णालय सर्व अद्ययावत सेवांसह येत्या सहा महिन्यांत नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. तर तृतीय स्तरावरील गुंतांगुतांची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा या रूग्णालयांमध्ये सुरू होईल, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
उल्हासनगरसह कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर ते कर्जतपर्यंतच्या तालुक्यांतील रूग्ण ज्या मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी येतात त्यांना सुविधा देण्यात उल्हासनगरचे मध्यवर्ती रूग्णालय कमी पडते. त्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयाला सर्व सोयी-सुविधांनी अद्ययावत करण्यासाठी सर्व कायदेशीर आणि कागदोपत्री पूर्तता तातडीने केली जाईल, असे यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. रुग्णालयाच्या आजूबाजूची जागा अधिग्रहित करून जिल्ह्याच्या धर्तीवर या रुग्णालयाचा भव्य पुनर्विकास केला जाणार आहे. याशिवाय, उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दोन मोठे दवाखाने, अंबरनाथचे छाया रुग्णालय आणि बदलापूर येथील आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन विविध स्तरांवरून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.
या रुग्णालयाची इमारत अत्यंत प्रशस्त आहे. हे रुग्णालय कामगारांसाठी मर्यादित न राहता त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक, महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांनाही घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयाची क्षमता आताच्या १०० खाटांवरून २०० खाटांपर्यंत वाढवण्यात येणार असून, येथे तृतीय स्तरावरील (टर्शरी केअर) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करता येतील अशी अद्ययावत व्यवस्था केली जाईल. कोणत्याही प्रकारची घाईगडबड न करता, अतिरिक्त सेवा आणि अतिरिक्त खाटांसह हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये ५ अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग असतील, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600