जिल्हा
खेळ मैदानापुरता नाही, तो आयुष्य घडवतो !
खेळ मैदानापुरता नाही, तो आयुष्य घडवतो !
फोटो: ठाणे वैभव
‘दृष्टि २०२५’मध्ये माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांचा कानमंत्र
वावीकर आय इन्स्टिट्यूट व ठाणेवैभव यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे: खेळ केवळ मैदानापुरता मर्यादित नसून तो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लढण्याची, अपयश पचवण्याची आणि पुढे जाण्याची ताकद देतो. स्वतःमधील क्रिएटिव्हिटी ओळखा, कुणाचीही नक्कल करू नका आणि मेहनतीशी कधीही तडजोड करू नका, असा कानमंत्र माजी भारतीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘दृष्टि २०२५’ हा भव्यदिव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे पश्चिम येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना निलेश कुलकर्णी यांनी यशाच्या प्रवासात धैर्य, सातत्य आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले.
ते पुढे म्हणाले, अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात एका छोट्या पावलानेच होते. ते पाऊल उचलले की अर्धी लढाई जिंकलेली असते,” असा आत्मविश्वास देणारा संदेश त्यांनी दिला. प्रवास कितीही मोठा असला, तरी इतिहासात तोच लक्षात राहतो, ज्याचे पाऊल सर्वप्रथम चंद्रावर पडते, असे उदाहरण देत त्यांनी तरुणांना धाडसाने पुढे जाण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी कृत्रिम तंत्रज्ञानावर अति अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतांचा अभ्यास करावा, स्वतः काहीतरी नव्याने घडवावे आणि कुणाचीही नक्कल करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. काम कोणतेही असो, ते सुरुवातीचे असो किंवा शेवटचे, कष्ट मात्र नेहमी सारखेच असले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
खेळ आणि आयुष्य यांची सांगड घालताना कुलकर्णी म्हणाले की, अपयश कसे पचवायचे हे कोणतेही पुस्तक शिकवत नाही; प्रत्येक व्यक्तीला तो मार्ग स्वतःच शोधावा लागतो. क्रिकेट किंवा कोणताही खेळ माणसाला परिस्थितीशी सामना करायला शिकवतो आणि त्यातून मानसिक बळ मिळते. वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व सांगताना त्यांनी लेखन व पत्रकारितेसाठी माहिती संकलन करणाऱ्या व्यक्तींच्या कष्टांना योग्य तो मान देण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान हे भविष्य असल्याचे मान्य करतानाच त्याचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “जर तुम्ही एक तास फोन किंवा गॅजेट्स वापरत असाल, तर किमान दोन तास कोणतीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे गरजेचे आहे कला, संस्कृती किंवा खेळ काहीही असो. हे दोन तास तुम्हाला जे देतात, ते कोणतेही गॅजेट देऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना दरवेळी एक टक्का अधिक मेहनत करण्याचा सल्ला देत त्यांनी सांगितले की, हाच एक टक्का पुढे जाऊन यशाला मोठा आकार देतो. आपल्याला आवडणारे काम कधीच थकवत नाही किंवा कंटाळवाणे वाटत नाही; उलट ते यशाच्या दिशेने घेऊन जाते, असेही त्यांनी नमूद केले.
लहानपणी खेळले जाणारे लगोरी, लपाछपी, लंगडी, विटी-दांडू यांसारखे पारंपरिक खेळ व्यक्तिमत्त्व विकासासाठी किती महत्त्वाचे होते, हे अधोरेखित केले. या खेळांमधून अपयश स्वीकारणे, त्यातून शिकणे आणि पुन्हा उभे राहणे सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी ‘दृष्टि २०२५’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600