जिल्हा
थकबाकीदारांचे होर्डींग उतरवले
कारवाईनंतर ६३ लाखांची थकबाकी वसूल
ठाणे: एकीकडे जाहिरातबाजीतून लाखोंचे उत्पन्न मिळवायचे तर दुसरीकडे महापालिकेचे शुल्क भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या जाहिरात एजन्सी आणि जाहिरातदारांविरोधात महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. आज १८ जाहिरातींचे फलक उतरवण्यात आल्यानंतर ६३ लाखांची थकबाकी जमा झाली.
शहरात ५२८ होर्डिंग्जना परवानगी देण्यात आली आहे. त्यातून वार्षिक किमान १५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात त्याचे निम्मेच शुल्क पालिकेच्या जाहिरात विभागात जमा होत आहे.
जाहिरातबाजी करून बक्कळ नफा कमवणार्या होर्डींगवाल्यांनी ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न थकवले आहे. अशा थकबाकीदारांवर कारवाईची टाच टाकत पालिकेने १८ होर्डिंग्ज आणि फलक उतरवले आहेत. तसेच त्यांच्याकडून थकीत ६३ लाखांची फी वसूल केली आहे.
राजकीय, शुभेच्छा, वाढदिवसापासून ते व्यावसायिक कंपन्यांच्या जाहिरातीचे महाकाय होर्डिंग्ज शहराच्या सर्वच मुख्य रस्त्यांवर, चौकांत, उड्डाणपुलाच्या कमानीवर झळकत आहेत. त्यातून जाहिरात कंपन्यांना बक्कळ उत्पन्नही मिळत आहे. मात्र करारानुसार ठाणे महापालिकेला शुल्क अदा करण्यास टाळाटाळ होत आहे.
वास्तविक ठाणे पालिकेच्या तिजोरीला हातभार लागावा आणि बेकायदा फलकबाजीला लगाम बसावा यासाठी ठाणे महपालिकेने जाहिरात धोरण जाहिर केले होते. सध्या ठाणे पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने प्रशासनाने वसुलीकडे लक्ष दिले आहे. त्याअंतर्गत जाहिरातीची फी थकवणार्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्त्वाखाली जाहिरात विभागाच्या कर्मचार्यांनी केली. या कारवाईनंतर जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली ६३ लाख रुपयांची फी जमा केली असल्याची माहिती जाहिरात विभागचे महेश सागर यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600