जिल्हा
टक्केवारीच्या वादात शाई धरण रखडले
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा थेट आरोप
ठाणे : ठाणेकर नागरिकांची पाण्याची समस्या सुटावी याकरिता मी २००२ साली मंजूर करून आणलेले शाई धरण टक्केवारीच्या वादात रखडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना केला.
मंगळवारी आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाणे महापालिकेत आले होते. यावेळी महापालिकेतील पत्रकार कक्षात त्यांनी पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प ) पक्षाचे गटनेते अभिजित पवार शहराध्यक्ष मनोज प्रधान ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत आदी उपस्थित होते.
आज ठाणे शहरातील मेट्रोचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे.रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त झाले आहेत. पुढच्या काळात लवकर मेट्रो सेवा सुरु होईल असे वाटत नाही, असा दावाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलतांना केला. मुळात मेट्रोची ट्रायल घेताना ज्या दोरीने मेट्रो खेचली होती, ती दोरी शोधायला मी सांगितली आहे, असा मिश्किल टोलाही आव्हाड यांनी लगावला.
ठाणे शहरात सुरु असलेल्या वृक्षतोडीबाबत बोलतांना आव्हाड यांनी सांगितले की या वृक्षतोडीवर ठाणेकर नागरिक काहीच बोलत नाहीत. एकेकाळी येऊरच्या जंगलात ४२ बिबटे होते, आता ती संख्या २०वर आली आहे. येत्या काही वर्षात ठाण्यात झाडे नसतील अशी परिस्थिती येणार आहे, असा दावाही त्यांनी केला. ठाणे महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरही स्थायी, परिवहनसह इतर विशेष समित्या अद्याप रखडल्या आहेत. याबाबत आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या हातात आहे. त्यांच्या मनात येईल तेव्हा ते नियुक्त्या करतील. ठाणेकरांनी त्यांना पाशवी बहुमत दिले आहे. ते करतील असा टोलाही त्यांनी लगावला.
२००२ साली राज्य शासनाशी भांडून मुंबई महापालिकेला मंजूर झालेले शाई धरण मी ठाणे महापालिकेसाठी आणले होते. पण टक्केवारीच्या वादात ते धरण रखडले, असा दावा आव्हाड यांनी केला. पुढील काळात पाण्याची मोठी समस्या ठाण्यात निर्माण होणार आहे. मुबलक पाणी उपलब्ध न झाल्याने ठाणेकरांची वाईट अवस्था होईल, असा दावाही त्यांनी केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600