जिल्हा
जुना कसारा घाट सहा तास खोळंबला
जुना कसारा घाट सहा तास खोळंबला
फोटो: ठाणे वैभव
कसारा: मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका वळणावर ट्रेलर बंद पडला होता. या दरम्यान पहाटे पाचच्या सुमारास एक महाकाय कंटेनर नाशिकच्या दिशेने जात असताना बंद पडलेल्या ट्रेलरवर जाऊन आदळला. कंटेनर महामार्गावर आडवा झाल्याने वाहतूक कोंडी झाली. नाशिककडे जाणारा मार्ग पूर्ण बंद झाल्याने मुंबईहुन नाशिक कडे जाणारी वाहने अडकून पडली. त्यामुळे वाहनांच्या रांगा ४ किलोमीटर पर्यत लागल्या होत्या.
कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, महामार्ग पोलीस केंद्रचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन सदस्य, टोल पेट्रोलिंग टीम यांनी सकाळी ९ वाजता घटनास्थळी धाव घेतली. ३ क्रेनच्या मदतीने ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर अपघातग्रस्त दोन्ही अवजड वाहने बाजूला करण्यात आली. तब्ब्ल सहा तासानंतर कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. परिणामी एस, टी. बस सह छोट्या कार देखील या वाहतूक कोडींत अडकल्याने छोटे मुले, वयोवृद्ध व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
पाऊस व दाट धुके घाटात असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी हलकी वाहने नाशिक-मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली. परंतु घाटात दाट धुके असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडचणी येत होत्या.
मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या कसारा घाटात लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रेलर ट्रक तत्काळ बाजूला केला असता किंवा त्या ट्रेलरच्या भोवती टोल प्रशासनाने सेफ्टी कोन लावून सुरक्षितता बाळगली असती तर आज अपघात झाला नसता व सहा तास प्रवाशी व वाहन चालक अडकले नसते.
कसारा घाटात अवजड वाहनाचा कायम अपघात होत असतो. परंतु, अवजड वाहने बंद पडलेली असोत किंवा अपघातग्रस्त असोत, ती वाहने महामार्गावरून बाजूला घेण्यासाठी टोल प्रशासनाकडे असलेली क्रेन कमी क्षमतेची असल्याने कुचकामी ठरत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600