जिल्हा

गुजरात-महाराष्ट्राच्या आकाशातून अमूर फाल्कनचा परतीचा प्रवास

गुजरात-महाराष्ट्राच्या आकाशातून अमूर फाल्कनचा परतीचा प्रवास
गुजरात-महाराष्ट्राच्या आकाशातून अमूर फाल्कनचा परतीचा प्रवास फोटो: ठाणे वैभव
सुरेश सोंडकर/ठाणे
जगातील  एका लांब आणि थरारक स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये गणला जाणारा अमूर फाल्कन अर्थात अमूर बाज सध्या दक्षिण आफ्रिकेतून परतीच्या प्रवासावर असून, गुजरात-महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्याच्या परिसरातूनही त्याच्या हालचालींची नोंद होत आहे. पर्यावरणीय समतोल, जैवविविधता आणि निसर्गचक्राचे जिवंत प्रतीक म्हणून या पक्ष्याकडे पाहिले जाते.
अमूर फाल्कन हा आकाराने लहान शिकारी पक्षी असून त्याची लांबी सुमारे २८ ते ३० सेंमी, वजन १०० ते १५० ग्रॅम आणि पंखांची रुंदी ६५ ते ७० सेंमी इतकी असते. राखाडी रंग, पोटाजवळ तांबूस-पांढरी छटा आणि नारिंगी पाय ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. सायबेरिया, मंगोलिया आणि उत्तर चीन येथे हा पक्षी घरटी बांधतो. वाळवी, टोळ आणि इतर किडे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.
दरवर्षी हा पक्षी तब्बल २२ हजार किलोमीटरचा प्रवास करतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेकडे जाताना तो नागालँड, महाराष्ट्र आणि कर्नाटकमार्गे अरबी समुद्र पार करतो. तर मार्च-एप्रिलमध्ये परतीच्या प्रवासात आफ्रिका, सोमालिया, आखाती किनारे आणि गुजरातमार्गे भारतात प्रवेश करतो. त्या काळात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा फायदा घेत हा पक्षी समुद्रावर अनेक दिवस न थांबता उडत रहात असल्याची माहिती पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील खाडी परिसर, खारफुटी, जलाशय आणि हरित पट्टे हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास मानले जातात. मात्र वाढते काँक्रिटीकरण, झाडांची तोड, प्रदूषण आणि ओलसर भूभागांचे कमी होणारे क्षेत्र यामुळे अशा पक्ष्यांच्या अस्तित्वावर परिणाम होत असल्याची चिंता  पक्षी मित्र माधव आठवले यांनी व्यक्त केली.
अमूर फाल्कनचे आगमन हे निसर्ग अद्याप जिवंत असल्याचे संकेत मानले जात असून, ठाणे जिल्ह्यात जैवविविधता संवर्धन, जलाशय संरक्षण आणि हरित क्षेत्र जपण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे.
“अमूर फाल्कन हा केवळ स्थलांतर करणारा पक्षी नाही, तर निसर्गातील अचूक वेळ, वारे, हवामान आणि अन्नसाखळी यांचा जिवंत अभ्यास आहे. हजारो किलोमीटरचा समुद्रप्रवास करतानाही हा पक्षी निसर्गावर पूर्ण विश्वास ठेवून प्रवास करतो. ठाणे जिल्ह्यातील खाड्या, ओलसर जागा आणि हरित क्षेत्रे भविष्यात अशा स्थलांतरित पक्ष्यांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे विकासासोबत नैसर्गिक अधिवास जपणे ही काळाची गरज आहे,”असे मत ठाण्यातील पक्षी अभ्यासक वीरेंद्र घरत यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600