जिल्हा
चिरा पडल्या, भिंत कोसळली; शिवस्मारकाची दुरवस्था झाली
चिरा पडल्या, भिंत कोसळली; शिवस्मारकाची दुरवस्था झाली
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: शहरात झालेल्या प्रकल्पांमध्ये आणि विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असताना घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला अवघ्या दोन महिन्यात अवकळा येऊ लागली आहे.
सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या चौथऱ्यावरील दगडी भिंतीचा काही भाग कोसळला असून बुरुजांवरील दगडही निसटण्याच्या स्थितीत आहेत. लोकार्पणानंतर इतक्या कमी कालावधीतच स्मारकाची झालेली दुरवस्था पाहून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा घोडबंदर रोडवरील आनंदनगरच्या नव्या चौकात उभारण्यात आला आहे. किल्ले रायगडावरील मेघडंबरीतील पुतळ्याच्या धर्तीवर हे स्मारक उभारण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. ६ मार्च रोजी तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
साडेआठ फूट उंचीचा सिंहासनारूढ शिवरायांचा पुतळा, रायगडाच्या मेघडंबरीची प्रतिकृती, चार बुरुज, तोफा आणि शस्त्रधारी मावळ्यांच्या प्रतिमा अशा भव्य स्वरूपात हे स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र लोकार्पणाला अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच स्मारकाच्या चौथऱ्यावरील एका बाजूची दगडी भिंत कोसळल्याचे समोर आले आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे काही बुरुजांवरील दगडही सैल झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दगडांच्या सांध्यांमध्ये पुरेसे सिमेंट न भरल्याचे दिसत असून त्यामुळे आणखी दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे स्मारकाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या काही वर्षांत राज्यात विविध ठिकाणी सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आता ठाण्यातील शिवस्मारकाच्याही कामावर संशय व्यक्त केला जात आहे. उद्घाटनावेळी भव्यतेची चर्चा झालेल्या या स्मारकाचा टिकाऊपणा अवघ्या दोन महिन्यांतच सिद्ध झाला असून संताप व्यक्त होत आहे.
चौकशीची अपेक्षा
स्मारकाच्या चौथऱ्याची भिंत कोसळणे आणि बुरुजांवरील दगड सैल होणे ही केवळ देखभालीची बाब नसून बांधकामाच्या गुणवत्तेशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे संपूर्ण कामाचे तांत्रिक लेखापरीक्षण करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600
प्रतिक्रिया (Comments)
अमित भोसले
२ तासांपूर्वीमेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.
सीमा देशपांडे
५ तासांपूर्वीघोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.