जिल्हा
बुलेट ट्रेनचा तात्पुरता पूल मुसळधार पावसात वाहून गेला
बुलेट ट्रेनचा तात्पुरता पूल मुसळधार पावसात वाहून गेला
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात या प्रकल्पाच्या बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
हा पूल बुलेट ट्रेनच्या मुख्य मार्गिकेचा नसून, प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी उभारण्यात आला होता, असा दावा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) कडून करण्यात आला आहे. मात्र, हा पूल वाहून गेल्याने प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, प्रकल्पाच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या ठिकाणी दरड कोसळल्याने त्या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबतही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता बुलेट ट्रेन प्रकल्पातील तात्पुरता पूल वाहून गेल्याने पुन्हा एकदा मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या कामाच्या दर्जावर चर्चा सुरू झाली आहे.
सध्या ठाणे जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे विविध टप्प्यांतील काम वेगाने सुरू आहे. दिवा परिसरात ठाणे बुलेट ट्रेन स्थानक उभारण्यात येत असून, या स्थानकाला जोडणारी मार्गिका खाडीवरून जाणार आहे. खाडीवरील मुख्य पूल उभारण्याचे काम सुरू असल्याने, त्या ठिकाणी यंत्रसामग्री, लोखंडी संरचना, काँक्रीट साहित्य तसेच कामगार आणि अधिकाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी स्वतंत्र तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. या पुलाचा वापर दररोज मोठ्या प्रमाणावर होत होता.
या घटनेमुळे प्रकल्पासाठी आवश्यक साहित्य आणि यंत्रसामग्रीची वाहतूक काही काळ विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच तात्पुरत्या पुलाची पुन्हा उभारणी करावी लागणार असल्याने मुख्य कामांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच निश्चित करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या वेळापत्रकात काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संबंधित पूल हा केवळ बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आला होता, असे सांगण्यात आले. तो बुलेट ट्रेनच्या कायमस्वरूपी मार्गिकेचा किंवा मुख्य पुलाचा भाग नाही. मुसळधार पावसामुळे तो वाहून गेला असून, आवश्यक ती पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. या घटनेमुळे मुख्य प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600